Maharashtra Weather Update : तामिळनाडू राज्यात घुसलेले ' फिंजल ' (Fengal) चक्रीवादळ भू-भागावरच क्षीणतेकडे झुकल्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याचे अवशेष अरबी समुद्रात प्रवेशले, तरीदेखील ते तीव्र होवु शकले नाही. ते विरळ होवून सोमलियाकडे निघून गेले. त्यामुळे अपेक्षित भाकिताप्रमाणे महाराष्ट्रावर त्याचा विशेष असा वातावरणीय परिणाम जाणवला नसल्याचे स्पष्टीकरण जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिले आहे.
सध्याच्या तीन दिवसातील वातावरण -
संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे रविवार दि. ७ डिसेंबरपर्यंत केवळ ढगाळलेलेच (Cloudy Weather) राहून, झालाच तर सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशा दहा जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Light Rain) शक्यता जाणवते.
सध्याच्या तीन दिवसातील तापमाने -
सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीइतके म्हणजे ३० तर पहाटे ५ चे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ डिग्रीने अधिक म्हणजे २० डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. तर मुंबईसह कोकणात दुपारी ३ चे कमाल तापमान ३१ ते ३४ तर पहाटे ५ चे किमान तापमान २४ ते २६ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झाली आहे.
पुढील थंडी -
सोमवार दि. ८ डिसेंबर पासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून, हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते. सोमवार दि. ८ ते शुक्रवार दि. १३ डिसेंबर पर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पहाटे ५ चे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ डिग्री सेंटीग्रेड पर्यंतही घसरू शकतो.
मुंबईसह कोकणातील पहाटे ५ चे किमान तापमान ही सध्या पेक्षा घसरून १८ ते २० डिग्री सेंटीग्रेडपर्यंत घसरण्याची शक्यता जाणवते. शनिवार दि. १४ डिसेंबरपासून पुढील थंडीच्या स्थितीबाबत त्यावेळी होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार अवगत केली जाईल.
- माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.