उद्या सोमवार दि.६ मे पासून पुढील आठवडाभर म्हणजे सोमवार दि.१३ मे पर्यंत संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड अशा १९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण तसेच खान्देश नाशिक नगर पुणे सातारा छ.सं.नगर जालना हिंगोली अश्या १७ जिल्ह्यात मात्र वरील वातावरणाची शक्यता नाही. खान्देशसहित संपूर्ण मध्य-महाराष्ट्र, व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार दि.७ मे पर्यन्त रात्रीचा असह्य उकाडा जाणवेल.
उष्णतेची लाट सदृश स्थिती महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ व खान्देश तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अशा २३ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार दि. ९ मे पर्यंत दुपारचे कमाल तापमान भाग बदलत ४० ते ४२ तसेच ४२ ते ४५ डिग्री से. ग्रेड. दरम्यान राहून ह्या ठिकाणी उष्णतेच्या लाट सदृश्य स्थिती जाणवेल, असे वाटते.
मागील महिन्यातील आढावा अवकाळीचा
गेल्या संपूर्ण एप्रिल महिन्यात विशेषतः महिन्याच्या उत्तर्धातील शेवटच्या काही दिवसातील माध्यमे व इतरांद्वारे अवकाळीबाबत दिल्या गेलेल्या अंदाजातील कथनी आणि प्रत्यक्षातील निसर्गातील घडणी पाहता ऐन रब्बी पीक काढणीच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे इशारे घाबरवणारेच ठरलेत, असे वाटते. लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे