Maharashtra Weather Update : कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Update) २९ जिल्ह्यात, कमाल ३२ ते ३५ तर किमान तापमान १३ ते २० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरीच्या ३ ते ५ डिग्री से. ग्रेड ने अधिक आहेत.
त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील (Marathwada Climate) छत्रपती संभाजीनगर, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील दुपारी ३ चे कमाल व पहाटे ५ चे किमान तापमान हे त्या ठिकाणच्या, त्यावेळच्या, सरासरी तापमानापेक्षा ३ ते ५ डिग्रीने सध्या वाढलेले आहे. पुणे व अकोला (विदर्भ) शहराचे कमाल तापमान (Temperarture) तर जवळपास ३६ तर सोलापूर चे ३५ तर नाशिकचे ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. नाशिक, पुणे, अकोला शहरांची ही वाढ जवळपास सरासरीच्या ५ डिग्रीने अधिक आहे. संपूर्ण विदर्भातही कमाल तापमात चांगलीच वाढ झालेली जाणवत आहे. जळगांवसह खान्देशांतील तीन जिल्ह्यात मात्र उष्णता विशेष अशी अत्याधिक जाणवत नाही.
मुंबईसह संपूर्ण कोकणातील तापमाने - मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात,कमाल २९ ते ३२ तर किमान तापमान १७ ते २१ डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. मुंबई ( कुलाबा ) वगळता, उर्वरित मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र ही तापमाने सरासरी इतकेच जाणवतात. मुंबई कुलाब्याचे पहाटेचे किमान तापमान मात्र २१ डिग्री से. ग्रेड असुन सरासरीच्या दिड डिग्रीने अधिक आहे. त्यामुळे तेथे उर्वरित महाराष्ट्राइतकी उष्णतेची दाहकता सध्या मुंबईसह कोकणात जाणवत नसली तरीदेखील, दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मुंबईत बऱ्याच वेळा ह्यापेक्षा अधिक आणि चांगलीच थंडी जाणवत असते.
कशामुळे वाढली ही उष्णता? वाढलेल्या उष्णतेचा संबंध लगेच काही अभ्यासक ग्लोबल वार्मिंगशी जोडून मोकळे होतात. प्रत्यक्षात सध्याची तात्पुरती वातावरणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात जाणवत आहे. गेल्या ३ ते ४ दिवसापासून, ठराविक दिशा न घेणारे असे, वारंवार दिशा बदलणाऱ्या पण कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन सध्या महाराष्ट्रावर चालु आहे. हवेचा पुर्व-पश्चिम कमी दाबाचा आस जरी महाराष्ट्रावर काहीसा जाणवत असला तरी एकूणच महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा कल हा घड्याळ काटा दिशेने असल्यामुळे, रात्रीची बाहेर पडणारी दिर्घ-लहरी उष्णता पूर्णपणे बाहेर फेकली जात नाही. त्यामुळे निरभ्र आकाश असूनही सध्या संचित, अत्याधिक उष्णता कोकण वगळता महाराष्ट्रात जाणवत आहे.
अजुन किती दिवस ही उष्णता जाणवेल? पुढील ५ ते ६ दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी पर्यन्त किमान तापमानात होणाऱ्या या वाढीमुळे थंडी अजुन कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २६० किमी वेगाने प्रवाही झोताचे ' पश्चिमी' वारे वाहत आहे. त्यामुळे या दोन प्रणल्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही. अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असे समजू नये.
महाराष्ट्रातील पाऊस - महाराष्ट्रावरील सध्याचे प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेंव्हा बंगालच्या उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेतून व त्यामुळे वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे (ताशी ३० ते ३५ किमी.) बंगालच्या उपसागरातून आर्द्रता महाराष्ट्राकडे लोटली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता १ ते ५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ढगाळ वातावरणसहित, मात्र केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. अजूनही वातावरणात जर एकाकी काही बदल झाल्यास त्याबाबत नक्कीच अवगत केले जाईल.
- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.