Maharashtra Weather Update : मध्य भारतात समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत आता छत्तीसगडमधील भिलाईच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घड्याळकाटा दिशेने प्रत्यावर्ती (घुसळल्यासारखे मध्य बिंदूपासून बाहेर फेकणारे) चक्रीय थंड वाऱ्यांच्या परिणामातून उत्तर भारतातील थंडीचा ओघ महाराष्ट्राकडे (Maharashtra Weather) असुन महाराष्ट्रात थंडीची लाट तर काही ठिकाणी थंडीच्या लाट सदृश्य स्थिती कायम असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
आज मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता महाराष्ट्रात निरीक्षण केलेल्या उपकरणीय नोंदीनुसार थंडीची लाट किंवा थंडीच्या (Cold Weather) लाट सदृश्य स्थिती जाणवणाऱ्या महाराष्ट्रातील काही ठिकाणांचे पहाटे साडेपाचचे किमान तापमान डिग्री सेन्टीग्रेडमध्ये खालील प्रमाणे आहे.
(कंसातील अंक सरासरीपेक्षा झालेली घसरण दाखवते आहे.) अलिबाग १३.७ (-४. ८), रत्नागिरी १५…३(-४. १), डहाणू १४. ९ (-३. ६), मुंबई सांताक्रूझ १५ (-३), अहिल्यानगर ५.६ (-४.५), नाशिक ८ (-३.५), पुणे ८(-३), सातारा ९.१ (-३. ३), नांदेड ८.६ (-४) परभणी ९.४ (-३.२), धाराशिव १०. २(-३), नागपूर ८. २ (३.८), वर्धा ९.५ (-३.३).
सध्या महाराष्ट्रात भागानुसार कमी अधिक प्रमाणात जाणवत असलेली अपेक्षित थंडी ही बुधवार दि. १८ डिसेंबर (संकष्टी चतुर्थी) पर्यंतच टिकून राहण्याची शक्यता आहे.
परवा, गुरुवार दि. १९ डिसेंबर पासून पुढील १० दिवस मात्र महाराष्ट्रात कमाल व किमान अशा दोन्हीही तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता असुन सध्या जाणवत असलेल्या थंडीपेक्षा महाराष्ट्रात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी जाणवणार नाही, असे वाटते.
मात्र वर्षाअखेरीस म्हणजे रविवार दि. २९ डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या! येत्या नजीकच्या काळात कोणत्याही वातावरणीय घडामोडीतून महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. दरम्यानच्या कालावधीत, महाराष्ट्रात वातावरणात काही बदल किंवा वातावरणीय घडामोड झाल्यास, अवगत केले जाईल.
- माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune