Maharashtra Weather Update : काल सोमवार दि. ९ डिसेंबर ला दिलेला अंदाज कायम असुन १८ डिसेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात थंडी (Cold Weather) जाणवणार असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर भारतातून पश्चिम मध्यप्रदेशापर्यंत पोहोचलेल्या थंडीच्या लाटेमुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक या चार जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानाचा (Temperature Down) पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्रीने घसरून तो ८ ते ९ डिग्री सेन्टीग्रेडपर्यंत जाणवत आहे.
त्याच्या परिणामातून नंदुरबार, धुळे (Dhule) जिल्ह्याच्या काही भागात साधारण दवांक बिंदू तापमान व आर्द्रतेमुळे खालावलेल्या किमान तापमानाला त्या ठिकाणी जमिनीवर भू -स्फटिकीकरण (बर्फाच्या किलच्या पडणे) झाले आहे. म्हणजेच हलका पांढरा दवाचा थर तयार होवून जमिनीवर होणारी हिमबाधा म्हणजे भू-स्फटिकीकरण होय. मात्र तेथील दुपारचे कमाल तापमान हे केवळ २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत असल्यामुळे रब्बीच्या शेत पिकांना सध्या फायदा होत आहे.
तापमाने - उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटे ५ चे किमान व दुपारी ३ चे कमाल अशी दोन्हीही तापमाने सरासरी इतकी असुन भागपरत्वे किमान १० ते १४ तर कमाल २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. दरम्यानच्या कालावधीत, वातावरणात काही बदल झाल्यास, अवगत केले जाईल.
- माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune