- गोविंद शिंदे
नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने (Marathwada Rain) कहर केला असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील बारूळ परिसर देखील मुसळधार पावसाने झोडपून काढला. ०१ सप्टेंबर रोजी ४० मिलिमीटर तर ०२ सप्टेंबर रोजी ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली आले असून पिकाचे शेतीचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीसह गुरा ढोरांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील बारुळ परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बारूळ महादेव मंदिर ते काटकळंबा या दोन गावांना जोडणारा रस्ता वाहून गेला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत असून शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे. तसेच मानार जलाशयातुन 1800 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. त्यामुले नदीकाठच्या गावांच्या सुरक्षेसाठी उपायोजनेसाठी प्रशासनाचे करण्यात येत आहे .
सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून ०२ सप्टेंबर रोजी बारूळ परिसरात एकूण 87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे शेतात, घरात, रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पाणीच पाणी दिसून येत आहे. सर्व परिसर जलमय झाला आहे. खरीप पिकातील कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्याचे उभे पीक वाहून गेले आहे. अनेक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य मार्गावरील व जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या शेती अवजारे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
मराठवाडा - हलका पाऊस
चंद्रपूर जवळ काल केंद्रित अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकल्यामुळे उद्या बुधवार दि.४ सप्टेंबर पासून मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड अश्या पाच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. उर्वरित हिंगोली, जालना व छ.सं.नगर अशा तीन जिल्ह्यात उद्या बुधवार दि. ४ ते मंगळवार दि. १० सप्टेंबरपर्यंत आठवडाभर मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.