नाशिक : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागवत तापमानात वाढ झाली आहे. दिवसागणिक होणान्या उन्हाच्या दाहकतेने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी मालेगावचे तापमान 43 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि शरीराची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वातीने करण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मालेगाव शहर व तालुक्याच्या तापमानाने चाळिशी पार केले आहे. दररोज तापमानात वाढ होत असल्याने नागरिक उन्हाच्या तीव्रतेमुळे हैराण झाले आहेत. दुपारच्या सत्रात कडक ऊन असल्यामुळे नागरिक उपरणे, टोपी, गॉगल आदींचा आधार घेत उन्हापासून बचाव करीत आहेत. उन्हामुळे विकारांमध्येही वाढ झाली आहे. आबालवृद्धांना उन्हाचा त्रास होत आहे. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाढत्या उन्हामुळे मजूर कामाला येण्यास नकार देत आहेत. शेतशिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांचा व पिकांचा पिण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे.
मालेगाव शहराच्या तामपानाचा पारा चाळीशीपार गेल्याने राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मालेगावची झाली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघात कक्ष सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महापालिका व मालेगाव सामान्य रुग्णालयाला महिनाभरापूर्वी प्राप्त आले आहे. नागरिकांनी उष्माघातापासून घ्यावयाची काळजी संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. तसेच सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे, मात्र नागरिकांना याबाबत सजग करण्यात यावे असे सूचित करण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस कसे असेल तापमान
पुढील पाच दिवसांचा तापमान अंदाज पाहिला असता 07 मे रोजी किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस, 08 मे रोजी किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, 09 मे रोजी किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, 10 मे रोजी किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर 11 मे रोजी किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.