अवकाळीचे वातावरण असले तरी मे महिन्याच्या मासिक अंदाजाप्रमाणे टोकाचे कमाल तापमान व सरासरीपेक्षा अधिकच्या उष्णतेच्या लाटेसंबंधीचे अपूर्ण भाकीत १९ मे पासून आठवडाभर म्हणजे २६ मेपर्यंत उष्णतेच्या आघाताने पूर्ण होईल असे वाटते. मुंबईसह कोकण, खान्देश, मराठवाड्यात उष्णतेची लाट सदृश किंवा दमटयुक्त उष्णतेची स्थिती ह्या १९ ते २६ मे पर्यंतच्या आठवड्यात जाणवेल, असा हवामान अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
अवकाळीची शक्यता कायमच
संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि.२६ मेपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. गुरुवार दि.२३ मे पासून तर दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या ८ जिल्ह्यात अवकाळीची तीव्रता अधिक जाणवेल. तसेच महाराष्ट्रात २७ मे पासून पूर्व-मोसमी गडगडाटीचा वळीव स्वरूपाच्या पावसाची शक्यताही नाकारता येणार नाही.
मान्सूनची लवकर आगमनाची शक्यता कशामुळे वाढली?
अंदमान निकोबार व केरळात मान्सून पोहोचण्या साठीची आवश्यक पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी अगोदरच सुरु झाली आहे. मान्सून आगमनासाठी, १० मे पासूनच, त्याच्या खालील पूरक मुख्य पाच अटी व सध्याचा त्याचा तीव्र प्रवाह पाहता, मान्सून वेळेच्या आधीच केरळात पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पूरक अटी -
अरबी समुद्रातून पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात संपूर्ण साडेचार किमी. च्या जाडीत जबरदस्त समुद्री वारे वाहणे आवश्यक असतात. सध्या त्यांनी निम्मी जाडी व्यापली आहेत. आग्नेय अ. समुद्रात व केरळ कि. पट्टी समोरील अलोट ढगाची दाटी होणे आवश्यक असते. सध्या अतिजोरदार पावसाला अगोदरच पूर्वमोसमी पावसाला तेथे सुरवात झाली असुन आठवडाभर पावसाची शक्यता जाणवते.
तसेच नैरूक्त दिशेकडून केरळाकडे जमीन समांतर ताशी ३० किमी समुद्री वारे वाहने आवश्यक असतात. सध्या ते उत्तरेकडे व नंतर वायव्येकडे वळत आहे. त्यातही सुधारणा होईल. संध्याकाळनंतर रात्रभर अरबी समुद्रातील पाणी पृष्ठभागवरून प्रति चौ. मिटर क्षेत्रफळावरून १९० वॉट्स क्षमतेने लंबलहरी उष्णताऊर्जा उत्सर्जित होऊन वर आकाशात बाहेर फेकणे आवश्यक असते. सध्याची तिची २०० वॉट्स ची क्षमता १० मे लाच ओलांडली आहे.
केरळतील विखुरलेल्या १४ वर्षामापी केंद्रापैकी १० केंद्रावर अडीच मिमी व अधिक पावसाची नोंद होणे आवश्यक असते. ही नोंद सध्या पूर्ण नसली तरी ही नोंद वाढतीकडे जाणवत आहे. त्यामुळे अंदमान ते केरळाकडे होणारी मान्सूनची वाटचाल सुद्धा वेगाने होवुन २८ ते ३ जून दरम्यानच्या कोणत्याही दिवशी मान्सून केरळ मध्ये पोहोचू शकतो, असे असले तरी एकंदरीत सध्याची अधिक पूरक वातावरणीय परिस्थिती पाहता, मान्सून केरळात पोहचण्यासाठी कदाचित जून १ तारीखही उजाडून न देण्याची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्रात मान्सून १५ जून दरम्यानच?
मे २८ ते जून ३ पर्यंतच्या आठवड्यात मान्सून कधीही केरळाच्या टोकावर जरी अपेक्षित असला तरी त्याच्या कोकणातील जोरदार वर्षावानंतर, सह्याद्री ओलांडून पूर्वेकडील उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश मान्सून प्रवाहातील बळकटीवरच अवलंबून असतो. केरळमध्ये पोहोचल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यास १० ते १२ दिवसाचा सरासरी कालावधी हा लागतोच. ह्याची नोंद शेतकऱ्यांच्या मनी असावी, असे वाटते.
लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे