Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात आज, उद्या, परवा (मंगळवार ते गुरुवार, ११ ते १३ जून) असे तीन दिवसादरम्यान मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी, मध्यम पावसाची (Rain) तर उर्वरित ठिकाणी तुरळक वळीव स्वरूपातील किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. शुक्रवार दि.१४ जूनपासून मुंबई व कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात मात्र मान्सूनचा (Monsoon) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
कालचा पाऊस काल १० जूनला महाराष्ट्रात अधिक पाऊस झालेल्या मुख्य ठिकाणच्या पावसाच्या सेमी. मधील नोंदी अशा - मुरुड १५, अलिबाग ५, दहिगांव (जळगांव जिल्हा) १४, जळगांव ५, भडगांव ७, निलंगा १३, लोहारा व उमरगा (धाराशिव जिल्हा) प्रत्येकी ११.
मान्सूनच्या प्रगतीची आजची स्थिती काय? अजूनही मान्सून ची फक्त अरबी समुद्रीय शाखाच महाराष्ट्रात पुढे सरकत आहे. बंगालच्या उपसागरीय शाखा जाग्यावरच स्थिरावलेली दिसत आहे. मान्सून ने आज गुजरातमधील नवसारी, खान्देशातील जळगांव तर विदर्भातील अकोला, पुसद या शहरांना स्पर्श केला. येत्या ४८ ते ७२ तासात मान्सून उर्वरित खान्देश, पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भात पोहोचण्याची अपेक्षा करू या! मान्सूनच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्रात खरीप पेरणी व लागवडीबाबत काय निर्णय असावा? महाराष्ट्रात १४-१५ जूनपर्यंत, जेथे जेथे, चांगला पाऊस होईल, त्या १० से. मी. ओल साध्य झालेल्या व पेर-उतार नंतर पीक-रोप ३० ते ४० दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ओलीवर, सिंचनाची काही सोय असलेल्या, चांगल्या प्रतीच्या जमिनीत, स्वतःच्या निर्णयावरच, सावधगिरी बाळगूनच पेरणीचे धाडस करावे, असे वाटते. कारण शुक्रवार दि.१४ जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. उर्वरित व जिरायत जमिनीसाठी खरीप हंगामातील पेरीसाठी अजुन भरपूर शिल्लक कालावधी उपलब्ध असल्यामुळे, सध्या तरी तेथे बाठर ओलीवर पेरणीची घाई करू नये, असे वाटते. महाराष्ट्रातील पावसासाठीच्या वातावरणीय प्रणाल्यांची सध्याची स्थिती काय आहे? (i) पावसाला पूरक ठरणारी मराठवाडा क्षेत्रावरील चक्रीय वाऱ्याची स्थिती निवळली आहे. (ii)उंचावरील पूर्व-पश्चिम वाऱ्याचा शिअर झोन उत्तरेकडे सरकण्याऐवजी उलट अंदाजे १०० किमी दक्षिणेकडे सरकला आहे. मान्सून वेगात झेपावण्यासाठी ही स्थिती पूरक नाही. (iii) भारत महासागरीय तापमानाची द्वि- ध्रुवीता (आयओडी)अनुकूल नाही. (iv) वि्षुववृत्तवरून पृथ्वीभोंवती पश्चिमेंकडून पूर्वेकडे चक्कर मारणारे, उष्णता परिणामातील कमी दाब क्षेत्राचे मॅडन-ज्यूलीयन दोलणे, सध्या तरी त्यांचे फेरीतील ठिकाण, हे भारत महासागरीय क्षेत्राच्या बाहेर तर आहेच, शिवाय दोलन(ऑसिलेशन क्रेस्ट व ट्रफची) विस्तृत वाढ- मर्यादेची पातळीही (एम्प्लिटुड) ही एक पेक्षा कमी म्हणजे मध्य रेषेजवळच रेंगाळतांना जाणवत आहे.
त्यामुळे आपल्याकडील मान्सून बळकटीसाठी त्या प्रणालीतून सध्या तरी अजुन दहा ते बारा दिवस म्हणजे २३ जून पर्यन्त आणि नंतरही कदाचित सध्या तरी चालना मिळण्याची शक्यता जाणवत नाही. (v) एल- निनो मावळतीकडे तर एन्सो तटस्थेकडे झुकत असल्यामुळे सध्य: कालावधीतील ही स्थिती पावसाला ना तारक ना मारक समजावी. अ. क्रं. (V) मधील वरील हवामानशास्त्रीय तांत्रिक माहिती हवामान साक्षरता प्रबोधनासाठीच समजावी, ही विनंती.
-माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.