एकीकडे मराठवाडा, विदर्भासह खान्देशातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रासाठी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 01 व 02 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज इगतपूरी विभागीय कृषी संशोधन केंद्राने वर्तविला आहे. तर खांदेशातील जिल्ह्यांसाठी आज, आतापर्यंत अंदाज वर्तविण्यात आलेला नाही. मात्र 01 व 02 मार्च रोजी हलक्या पावसाची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. ०१ व ०२ मार्च २०२४ रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान ३३-३६ डिग्री सें. व किमान तापमान १६-१९ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ९-१३ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
जळगाव उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातबाबत बोलताना माणिकराव खुळे म्हणाले की, सद्यस्थितीत आज कोणताही हवामान अंदाज वर्तविण्यात आलेला नाही. शिवाय दर सहा तासांनी अपडेट बदलत असल्याने आताच काही सांगता येणार नाही. मात्र ०१ व ०२ मार्च ला जळगाव जिल्ह्यातील काही भागात हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज आणि उद्या नेमकं वातावरण कसे असेल, यावर पुढील शक्यता असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या काळात पिकांची काळजी
दरम्यान दि. ०१ व ०२ मार्च २०२४ रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता रबी पिकांची कापणी त्वरित करावी व कापणी/मळणी केलेल्या पिकांना ताडपत्रीने किंवा प्लास्टिक पेपरने झाकावे किंवा सुरक्षित जागेवर ठेवावे. कोरडे व उष्ण हवामान लक्षात घेऊन वेलवर्गीय भाजीपाला पिकात आच्छादनाचा वापर करावा. उन्हाळी पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो जेणेकरून पाण्याचा वापर कार्यक्षमता वाढेल आणि पाण्याची बचत होईल. नवीन लागवड केलेल्या फळ झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. उन्हाळी बाजरी पिकाला पेरणीपासून सुरवातीचे ३० दिवस शेत तण विरहित ठेवणे गरजेचे असते. भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या १५ ते २० दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात. गहू पीक सध्या दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. गव्हाच्या काही जातींचे (उदा. एनआय.५४३९, फुले त्र्यंबक) दाणे पीक पक्व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते.