नाशिक : ऑगस्ट महिन्यात लावलेल्या हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यातील (Nashik) प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ६६.८९ टक्के झाला आहे. त्यामुळे सहा धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिकमधून सुमारे १७ टीएमसीपेक्षा जास्त पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले आहे. नाशिकमधील गंगापूर धरणात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.
जुलै महिन्यात पाऊस (Nashik Rain) रुसल्याने जिल्ह्यावर चिंतेचे ढग निर्माण झाले होते. प्रमुख धरणांमधील पाणीसाठाही बराच कमी झाला होता. ऑगस्टच्या सुरुवातीला मात्र दमदार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहिले. तर प्रमुख धरणांमधील साठाही वाढला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्यःस्थितीत ८६.१३ टक्के पाणी आहे गेल्यावर्षी हाच साठा ९०.४३ टक्के होता. म्हणजे तुलनेने चार टक्के साठा कमीच आहे.
विसर्ग सुरूच
यावर्षी सुरुवातीच्या काळात दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्यांनी अधिक आहे. भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही शंभर टक्के भरली आहेत. गंगापूर धरणातून १२७२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच दारणातून ७५०, भावलीतून ७८९, वालदेवीतून १००, कडवातून २०९५, भोजापूरमधून ३४२ असा विसर्ग करण्यात येत आहे.
धरणांचा पाणीसाठा
आजमितीस नाशिक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा पाहिला असता गंगापूर धरण 86.13 टक्के, कश्यपी धरण 61.23 टक्के, गौतमी गोदावरी 91.76 टक्के, आळंदी 99.26 टक्के, पालखेड धरण 55.74 टक्के, करंजवण धरण 67.38 टक्के, वाघाड धरण 93.66 टक्के, ओझरखेड धरण 51.55 टक्के, पुणेगाव धरण 76.08 टक्के, तिसगाव धरण 29.45 टक्के तर दारणा धरण 87.37 टक्के असा जलसाठा आहे.
४२२ गाव, पाड्यांवर १०३ टँकर
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली जोर'धार' धरल्यानंतरही जिल्ह्यात जवळपास १०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यात सर्वाधिक १६४ गाव, पाड्यांवर २० टँकर सुरू असून, नांदगाव तालुक्यात १०१ गाव-पाड्यांवर १९ त्या खालोखाल चांदवड, मालेगावमध्ये ५१, येवला ३७ तर बागलाणमध्ये १८ गावपाड्यांवर अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे.