नाशिक : यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत मृग नक्षत्राच्या (Mrug Nakshatra) पावसाने चांगला हात दिल्याने खरिपाच्या पेरण्यांना मदत होऊ शकली आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मृग नक्षत्रात सरासरी २०.८ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र ९८.४ मिमी पाऊस होऊन ८० टक्क्यांहून अधिक नोंद झाली आहे. आठ तालुक्यांमध्ये जून महिन्याच्या पावसाची सरासरी मृग नक्षत्रातच ओलांडली गेली आहे. आता आर्द्रा नक्षत्रात बऱ्यापैकी व सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान खात्यासह पंचांगकर्त्यांनीही वर्तविलेला आहे.
यंदा मान्सूनचे वेळेत आगमन (Monsoon 2024) झाले. गेल्या ८ जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. या नक्षत्राच्या पूर्वार्धात काही प्रमाणात पावसाचा खंड पडला. परंतु अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने जमिनीत ओल येण्यास बरीच मदत झाली. त्यामुळे खरिपाच्या (Kharip Sowing) पेरण्यांना वेग येऊ शकला. दि. २१ जून रोजी मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. दि. ८ ते २१ जून या कालावधीत मृग नक्षत्रात नाशिक जिल्ह्यात सरासरी ९८.४ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. जून महिन्याची पावसाची एकूण सरासरी १२२.१ मिमी आहे. मृग नक्षत्रातच जिल्ह्यातील आठ तालुक्यांनी त्यांची एकूण सरासरी ओलांडली आहे. त्यात मालेगाव तालुका (१३२.५ टक्के), बागलाण (१०१.६ टक्के), नांदगाव (१५४.७ टक्के), निफाड (१५८.२ टक्के), सिन्नर (१४१७ टक्के), येवला (११३.५ टक्के), चांदवड (१६७.७ टक्के) आणि देवळा (१८७.१ टक्के) याप्रमाणे पाऊस झालेला आहे.
विशेष म्हणजे, पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात एकूण सरासरीच्या सर्वात कमी म्हणजे अवघा ३०.५ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. या तालुक्याची जून महिन्याची सरासरी ३४७ मिमी असताना २१ जूनअखेर अवघा १०५ मिमी पाऊस कोसळला आहे. याशिवाय पेठ (४३.९ टक्के), सुरगाणा (३४.७ टक्के), नाशिक (५४.८ टक्के), त्र्यंबकेश्वर (५७.८ टक्के) तर दिंडोरी (७७.८ टक्के) पाऊस नोंदविला गेला आहे. जिल्ह्यात मागी वर्षी मृग नक्षत्रात अवघा २०.८ मिमी पाऊस नोंदवला गेला होता. यंदा मात्र मृगाने समाधानकारक हजेरी लावल्याने सरासरी ९८.४ मिमी पाऊस झालेला आहे.
चार दिवस पावसाचेआर्द्रा नक्षत्राला दि. २१ जून रोजी प्रारंभ झाला असून, या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक मोर आहे. हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज दिलेला आहे तर पंचांगकत्यांनी या नक्षत्रात बऱ्यापैकी व सर्वत्र पाऊस होईल, असे भाकीत वर्तविले आहे. २४ ते २८ जून व ३ ते ४ जुलै रोजी चांगल्या पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. मागील वर्षी मृग नक्षत्राने निराशा केली: परंतु आर्द्रा नक्षत्रात १३५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाही आर्दा भरभरून बरसेल काय, याची प्रतीक्षा लागून राहणार आहे.
कोणत्या मंडलात किती पाऊस? मालेगाव तालुक्यातील कौळाणे मंडलात 43.7 टक्के, बागलाण तालुक्यातील जायखेडा मंडळात 47.7 टक्के, कळवण तालुक्यात कळवण मंडळात 21.5 टक्के, नांदगाव तालुक्यातील बाणगाव मंडळात 112.7 टक्के, सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण मंडळात 9.7 टक्के, नाशिक तालुक्यातील गिरणारे मंडळात 14.3 टक्के, दिंडोरी तालुक्यातील रामशेज मंडलात 7.1 टक्के, इगतपुरी तालुक्यातील नांदगाव मंडलात 11.4 टक्के, पेठ तालुक्यातील कोहोर मंडलात 21.9 टक्के, निफाड तालुक्यातील सायखेडा मंडलात 32.9 टक्के, सिन्नर तालुक्यातील देवपूर मंडळात 73.8 टक्के, येवला तालुक्यातील येवला मंडळात 91.8 टक्के, चांदवड तालुक्यातील रायपूर मंडळात 82.5 टक्के, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्रंबक मंडलात 31.8 टक्के, देवळा तालुक्यातील लोहणेर मंडळात 147.4 टक्के पाऊस झाला आहे.