Join us

Dam Storage : वाढत्या उन्हांन बाष्पीभवनात वाढ, गंगापूर धरणात किती पाणी शिल्लक? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 4:48 PM

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील २४ प्रकल्पात एकूण केवळ २५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

नाशिक : वाढत्या उन्हाने जीवाची लाहीलाही झाली असून याचा परिणाम धरणांच्या पाणीपातळीवरही होऊ लागला आहे. गंगापूर धरणासह जिल्ह्यातील विविध धरण समूहांमध्ये पाण्याची पातळी वेगाने खाली येत आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील २४ प्रकल्पात एकूण केवळ २५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. म्हणजेच एक एक धरणात केवळ एक एक टक्केच पाणी असल्याचे यावरून दिसून येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले असून पाणीटंचाईची भीषण समस्या उभी ठाकली आहे. अशातच या वाढत्या उन्हाचा परिणाम धरणाच्या पाणीपातळीवर होत असल्याने धरणांची पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. गंगापूर धरणात सद्यस्थितीत केवळ ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच हा साठा टिकवणे गरजेचे असल्याने येणाऱ्या काळात पाऊस लांबला तर धरणसाठ्यात होणारी घट लक्षात घेता पुढील काळात पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, दररोज तापमानाचा पारा वाढतच असल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे.

गंगापूर धरण समूहात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाली असून ४२.६६ टक्के पाणी आहे. मागील वर्षी हाच साठा ४९.७२ टक्के होता. पालखेड धरण समूहात मागील वर्षीच्या ३८.५९ टक्के साठ्याच्या तुलनेत यावर्षी ३८.१३ टक्के पाणी आहे. ओझरखेड धरणात केवळ ०५ टक्के एवढे पाणी आहे तर दारणा धरण समूहात मागील वर्षी असलेल्या ६५.७६ टक्के साठ्याच्या तुलनेत यंदा २४.०५ टक्के पाणीसाठा आहे. सर्वच धरणांची एकत्रित टक्केवारी काढल्यास नाशिक विभागातील धरण समूहांमध्ये २५.४१ टक्के पाणी आहे.

नाशकात तापमान ४०.७ अंश सेल्सिअस

उन्हाळ्याची तीव्रता वाढतच असून आज नाशकात किमान तापमान २४.५ तर कमाल तापमान तब्बल ४०.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. आजपर्यंत ३८ अंशांपर्यंत तापमान होते. कालपासून मात्र तापमानाने चाळीशी पार केली आहे. दुपारी १२ वाजेपासून तापमानाचा पारा वाढला होता. घरात उकाडा हैराण करत आहे. रात्रीचाही उकाडा असह्य होत असल्याने घरात बसणे अवघड होत आहे.

टॅग्स :शेतीखरीपनाशिकधरणगंगापूर धरण