Join us

Nashik Rain Update : जून-जुलै कोरडा, ऑगस्टने सरासरी भरून काढली, नाशिक जिल्ह्यात 'इतका' पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 1:34 PM

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 41 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) शुक्रवारीही पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ९.६ टक्के पाऊस झाला आहे. जून आणि जुलै महिना कोरडा गेला असताना ऑगस्ट महिन्याने तीनही महिन्यांची कमतरता भरून काढली असून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी ५४.७ इतका असल्याने पावसाने यंदा ९६.३ इतकी सरासरी गाठली आहे.

धरणक्षेत्रात पावसाची आभाळमाया कायम असल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांचा साठा शंभरीकडे झेपाऊ लागला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून दहा धरणे तर पूर्णपणे भरल्याने ओसंडून वाहत आहेत. इतरही धरणे ९० टक्क्यांपर्यंत भरल्याने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ऑगस्टमध्ये धुवाधार बरसणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी तुरळक का होईना सरी बरसत आहेत. चालू महिन्याच्या पाच दिवसांत २२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गंगापूर धरण तर ९७ टक्के भरले

गंगापूर धरण तर ९७ टक्के भरले असून त्यातून २,२१० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. काश्यपी धरणही ९८ टक्के भरले असून ३५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गौतमी, गोदावरी ९३ टक्के भरले आहे. तसेच दहा धरणे पूर्णपणे भरली असून ती ओसंडून वाहत आहे. पूर्णपणे भरलेल्या धरणात आळंदीचा समावेश असून ८७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वाघाडही याच यादीत असून ३१३ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. 

तसेच गिरणा धरणात ९६ टक्के साठा झाला असून १,२२१ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. ओझरखेडमधून ६८ तर तिसगावमधून ८४ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. भावलीदेखील शंभर टक्के भरले असून तेथून २९० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वालदेवीतून १८३, नांदूरमध्यमेश्वरमधून ७,९२४, भोजापूरमधून ५३९, हरण- बारीतून ५२३, केळझरमधून ७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

टॅग्स :पाऊसहवामानशेती क्षेत्रनाशिकगंगापूर धरण