Join us

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, आज ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 10:17 AM

Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून, शनिवारी दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून, शनिवारी दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे बहुतांश धरणांची पाणीपातळी वाढली आहे. काही धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गातसुद्धा वाढ करण्यात आली आहे. नांदूरमधमेश्वरमधून (Nandurmadhyameshwer) पुढे गोदावरीत एकूण ३६,७६१ क्यूसेकचा विसर्ग शनिवारी रात्री प्रवाहित करण्यात आला होता.

हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) रविवारीसुद्धा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दर्शविण्यात आला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. घाटमाथ्यासह डोंगरदऱ्यांच्या दुर्गम तालुक्यांच्या परिसरात खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  शहरात सातत्याने पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली पहावयास मिळाली. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागल्याने पाणीपातळीत भर पडली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत गोदावरीच्या होळकर पुलाखालून ५११ क्युसेक इतके पाणी रामकुंडात प्रवाहित झालेले होते.

पावसाने सातत्य राखल्याने दारणा धरणामधून सुरू असलेला विसर्ग शनिवारी सकाळी ३,४४४ क्यूसेकने वाढविण्यात आला. यामुळे एकूण १९,९७२ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात प्रवाहित झाला आहे. कडवा धरणामधून ११ हजार २८९८, तर, पुनंद (अर्जुनसागर) धरणातून ५,४४० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आगामी दिवसातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. नांदूरमधमेश्वरमधून सुरू असलेला विसर्ग रात्री १० वाजता ३,१५५ क्यूसेकने वाढविण्यात आल्याने एकूण ३६ हजार ७६१ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात प्रवाहित झाला होता.जिल्ह्यातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालखेड धरणाच्या परिसरात शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कादवा नदीत सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला.

गंगापूर धरण ७२ टक्के भरलेगंगापूर धरणाची पाणी पातळी शनिवारी सकाळपर्यंत ६० मिमीपर्यंत पाऊस पडला, तसेच धरणाच्या पाणलोटक्षेत्रातसुद्धा जोरदार पाऊस झाल्यामुळे सकाळी सहा वाजेपर्यंत धरणातील जलसाठा ७२ टक्क्यांवर पोहचला. गंगापूर धरण समूहातील काश्यपीत ४२, आंबोलीमध्ये ७६, गौतमीमध्ये ५७ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ५० मिमी इतका पाऊस सकाळपर्यंत मोजण्यात आला होता. दिवसभरसुद्धा पावसाचा जोर कायम होता. यामुळे धरणसाठा अधिक वाढेल. पावसाचा जोर कायम राहिल्यास रविवारी धरणातून पहिला विसर्ग केला जाऊ शकतो, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसनाशिकगंगापूर धरणशेती