Nashik Rain :नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यातील काही भागात उष्ण हवामानासह दुपारनंतर मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. मागील आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. यावेळी मात्र विजेच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट देखील अनुभवयास मिळत आहे. आज दुपारी देखील ढंगाची गर्दी होऊन मुसळधार पावसाचे आगमन झाले. अगदी कमी वेळेत जास्त पाऊस झाला.
गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने तापमानात (Temprature) वाढ झाल्याचे चित्र होते. यात उन्हाचा कडाका वाढला आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला होता. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) पट्ट्यात टोमॅटो लागवड सुरु असल्याने रोपे सुकू लागली होती. मात्र कालपासून अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने सुरवात केली. काही वेळातच ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. यात विजांचा कडकडाट गडगडाट देखील अनुभवयास मिळाला.
आज दुपारी १ वाजेपासून काळ्या ढगांची गर्दी जमल्यानंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली. यात नाशिक शहर, गिरणारे, त्र्यंबकेश्वर, शहराच्या आजूबाजूचा परिसर पावसाने व्यापून टाकला. कमी वेळेत झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले. तर अनेक नाले देखील वाहू लागले. या ढगांच्या गडगडाटात झालेल्या पावसाला ग्रामीण भागात वळवाचा पाऊस आला, असे म्हटले जाते.
खरीप पिकांना दिलासा
दरम्यान नाशिक जिल्ह्यात पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली होती. त्यामुळे खरीप पिकांना उन्हाचा चांगलाच चटका बसल्याचे चित्र होते. शेतातील पाणी देखील कमी होऊ लागल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर होती. अशातच कालपासून पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना, खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील, भात, टोमॅटो पिकांना हा पाऊस दिलासादायक ठरत आहे.