Join us

Magha Nakshatra : मघा नक्षत्राला प्रारंभ, 'या' नक्षत्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 1:45 PM

Magha Nakshatra : आतापर्यंत अडीच महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५४६.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

नाशिक : गाढव या वाहनावर स्वार होऊन आलेल्या आश्लेषा नक्षत्रात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) काही तालुके वगळता जवळपास आठ तालुक्यांमध्ये पावसाचे धुमशान बघायला मिळाले नाही. पूर्वार्धात बऱ्यापैकी सलामी देणाऱ्या पावसाने उत्तरार्धात ओढ दिली. आश्लेषा नक्षत्रात सरासरी १०६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आता शुक्रवारी रात्री मघा नक्षत्राला (Magha Nakshatra) प्रारंभ झाला असून, या कोल्हा या वाहनावर स्वार होऊन येणाऱ्या या नक्षत्रातही पाऊस हुलकावण्या देण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काही तालुक्यात अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांबाबत चिंता करण्यासारखीच स्थिती आहे.

नाशिक जिल्ह्यात दि. ३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत आश्लेषा नक्षत्रात सरासरी १०६.७ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. आतापर्यंत अडीच महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५४६.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा दि. ३ ते १६ ऑगस्ट या पाऊसमान समाधानकारक असले तरी अद्यापही जिल्ह्यातील निम्मे तालुके दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आश्लेषा नक्षत्रात आठ तालुक्यांत शंभर मि.मी.च्या आत पावसाची नोंद झालेली आहे. आकडेवारीनुसार ११ तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे, तर सुरगाणा, नाशिक, इगतपुरी व पेठ तालुक्याने अद्याप पावसाची सरासरी शंभरी गाठलेली नाही. 

आश्लेषा नक्षत्रात किती पाऊस झाला? 

आश्लेषा नक्षत्रात मालेगाव तालुक्यात ३५.९ मि.मी., बागलाण- ७१.७ मि.मी., कळवण १२३.६ मि.मी., नांदगाव ५१.१ मि.मी., सुरगाणा ३२३.६ मि.मी., नाशिक ११५.८ मि.मी., दिंडोरी १३३.७ मि.मी., इगतपुरी २६०.८ मि.मी., पेठ २५७.९ मि.मी., निफाड ५५.३ मि.मी., सिन्नर ४९ मि.मी., येवला २९.३ मि.मी., चांदवड ८६.९ मि.मी., त्र्यंबकेश्वर २७५.६ मि.मी., देवळा ६६.८ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. येवला तालुक्यात सर्वात कमी तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७०.३ मि.मी. पावसाची नोंद झालेली होती ती यंदा ५४६.१ मि.मी. इतकी नोंदवली गेली आहे. 

मघा नक्षत्रात कुठे सरी, कुठे ओढमघा नक्षत्राला दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री ७.४४ वाजता प्रारंभ झाला आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. दाते पंचांग यांच्या अंदाजानुसार, १४ ऑगस्टची मंगळ, गुरु युती, १९ ऑगस्टची रवि, बुध युती व शुक्र-शनी प्रतियुतीचा विचार करता या नक्षत्रात खंडित वृष्टीचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. या नक्षत्रात पाऊस हुलकावण्या देणार असून, काही भागात जोरदार वृष्टी तर काही भागात पावसाने ओढ दिलेली दिसेल, दि. १७ ते २० ऑगस्ट तसेच २४, २५ २८ व २९ ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांची वाढ चिता वाढवू शकते.

टॅग्स :पाऊसनाशिकहवामानमोसमी पाऊसशेती क्षेत्र