Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ऑगस्टच्या शेवटी पावसाने मुसळधार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक धरणे निम्म्यावर होती, ती फुल होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र मागील दोन दिवस पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तर उद्यापासून पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस मध्यम पावसासोबत हवामान दमट राहण्याची शक्यता आहे.
जून महिना आणि मृग नक्षत्र संपल्यानंतरही प्रतीक्षा करायला लावणाऱ्या वरुणराजाने यंदा अंमळ उशिराच हजेरी लावल्यानंतरही ऑगस्टअखेरीस आपला बैंकलॉग भरून काढत मागील वर्षाच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. २०२३ मध्ये ऑगस्टअखेर धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा होता तर यंदा हा साठा ९२.८७ टक्क्यांवर पोहोचल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. तर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता मध्यम पावसासोबत हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. कमाल तापमान २८-२९ डिग्री सें. व किमान तापमान २२-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग १५-१६ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
०२ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट
हवामानाचा अंदाज आणि चेतावणी लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील काही भागात दि. ३१ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २०२४ दरम्यान (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच दि. ०३ सप्टेंबर २०२४ रोजी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वाहण्याची दाट शक्यता आहे.