Nashik Rain Update : गेल्या आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्यात अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. आता जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात दि. ०९ ते ११ सप्टेंबर २०२४ दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊसनाशिक जिल्ह्यात होण्याची दाट शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. म्हणजेच पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सामान्य सल्ला
जोरदार पावसाचा अंदाज (दि. ०९ ते ११ सप्टेंबर २०२४) लक्षात घेता खरीप पिकांवरील किटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणीचे कामे थांबवावी. तसेच पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पावसापासून होणाऱ्या संभाव्य नुकसान टाळण्याकरीता उपायोजना कराव्यात. विद्युत उपकरणे किंवा वायर/केबलचा संपर्क टाळा. कोणत्याही धातू- ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकींचा संपर्क दूर ठेवा. जे धातू किंवा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत.
भात, नाचणी, वरई, कांदा, भाजीपाला व इतर खरीप पिकांसाठी
- नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्र व उप पर्वतीय क्षेत्रातील जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता खरीप भात, नाचणी, वरई व पुनर्लागवड केलेल्या क्षेत्रातील पाणी साचले असल्यास त्वरित बाहेर काढणे .
- पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
- त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत. पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल.
- जोराच्या वारा व पाऊसापासून होणाऱ्या संभाव्य नुकसान टाळण्याकरीता उपायोजना कराव्यात.
- जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
- पावसाचा अंदाज घेवुनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- खरीप टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, गवार, व वेलवर्गीय भाजीपाला तसेच कोबी व फ्लॉवर पिकामध्ये खांदणी करून झाडांना भर लावावी.
- द्राक्ष व डाळिंब बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत. पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल.
स्रोत : ग्रामिण कृषि मौसम सेवा, इगतपुरी, विभागीय कृषि संशोधन केंद्र, इगतपुरी.