Join us

Nashik Temperature : नाशिक जिल्हा तापला, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 2:47 PM

नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअसइतके कमाल तापमान नोंदविले गेले. 

नाशिक : गेल्या दोन वर्षांमध्ये यंदाचा एप्रिल महिना नाशिककरांसाठी तापदायक ठरला आहे. एप्रिलअखेर दोनदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककरांना करावा लागला. हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअसइतके कमाल तापमान पेठरोडवरील हवामान केंद्रात नोंदविले गेले. 

पंधरवड्यापूर्वी मंगळवारी सायंकाळी नाशिक शहरात कमाल तापमानाचा पारा थेट ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. यापेक्षा जास्त कमाल तापमान आतापर्यंत नोंदविले गेले नव्हते. त्यावेळी सलग चार दिवस कमाल तापमान हे ४० पार स्थिरावत होते. रविवारी कमाल तापमान ४१ अंशाच्याही पुढे सरकले. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. घरातसुद्धा नागरिकांना उष्मा जाणवत होता. तसेच उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळविण्यासाठी विविध रस्त्यांलगत असलेल्या ऊसाच्या गुऱ्हाळाभोवती नागरिकांनी गर्दी केली होती.

२०२२ ला समान तापमान

नाशिक शहरात एप्रिल महिन्याच्या २८ तारखेला यापूर्वी ४१.१ अंश इतके तापमान २०२२साली नोंदविले गेले होते. त्यानंतर यावर्षी या तारखेला इतके कमाल तापमानाची नोंद झाली. २०२२ हे वर्षदेखील चांगल्या पर्जन्यमानाचे राहिले होते. यावर्षीही १२१९.५ मिमी इतका पाऊस हंगामात नाशिक शहरात पडल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. जुलैमध्ये ५५८.४ मिमी इतका सर्वाधिक पाऊस पडला होता.

'ते' चार दिवस होते चाळिशीचे...

१५ ते १८ एप्रिल हे चार दिवस नाशिककरांसाठी उष्णतेच्या लाटेचे होते. ४०.४ ते ४०.७च्या दरम्यान कमाल तापमान या चार दिवसांत नोंदविले गेले होते. तसेच किमान तापमान २२ ते २४.५ अंशापर्यंत स्थिरावले होते.

रात्रीसुद्धा फुटतोय घाम

कमाल तापमानासोबत किमान तापमानामध्येही वाढ झाली आहे. यामुळे नाशिककरांना रात्रीसुद्धा घरात घाम फुटत आहे. दोन्ही प्रकारच्या तापमानाचा आलेख चढता राहिल्याने नागरिकांना झळा असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान मोजले गेले.

यंदा २०१९ चा उच्चांक मागे पडणार..?

नाशिक शहरासाठी २०१९ हे वर्ष मागील दशकभरात सर्वाधिक उष्ण राहिले होते. २८ एप्रिल २०१९ साली दहा वर्षांतील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान शहरात मोजण्यात आले होते. त्याचवर्षी शहरात पावसाचे प्रमाणदेखील सर्वाधिक १२३४.४ मिमी इतके राहिले होते.

टॅग्स :नाशिकशेतीतापमानशेती क्षेत्र