नाशिक : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात मोठे नुकसान पुणे, संगमनेर जालनासह नाशिक जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसला. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सिन्नर, चांदवड भागात पाऊस झाला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पुढील पाच दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता इगतपुरी ग्रामीण मौसम सेवा केंद्राने वर्तवली आहे.
आज राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गडगडाटी आवाजाने अनेक ठिकाणी आवक पाऊस कोसळला. नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील अभोणा आणि सिन्नर, चांदवड तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. कमाल तापमान ३६-३८ डिग्री सें. व किमान तापमान २१-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ११-१५ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्राने वर्तवली आहे.
हवामान सतर्कता / इशाराहवामानाचा अंदाज आणि चेतावणी लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी दि. १० ते १२ मे २०२४ दरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच दि. १३ व १४ मे २०२४ रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा आर एम सी मुंबईव्दारे जारी केलेल्या जिल्हास्तरीय अंदाज आणि चेतावणीवर आधारितकेला आहे.
हवामानावर आधारित कृषीसल्ला
मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता कापणी/मळणी केलेले पिके, फळे व भाजीपाला, पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे संरक्षण करा. जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे जमिन चांगली तापुन त्यामधील जिवजंतुचा नाश होवुन खरीप पिकातील तणांचे प्रमाण, किड व रोगाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. फळपिकांमध्ये शक्यतो खुरपणी करुन घ्यावी व बोर्डोपेस्ट खोडांना लावावे. पाण्याची तीव्र कमतरता लक्ष्यात घेता भाजीपाला व फळपिकांमधील दोन पाण्याच्या पाळीमधील अंतर कमी ठेवावे व पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करावा.
सौजन्य ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषि हवामान प्रक्षेत्र विभागमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी ता. इगतपुरी, जि. नाशिक