नाशिक : यंदा पावसाळ्यात वरुणराजाने नाशिकवर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यातील (Nashik Water Storage) धरणसमूहात यंदा चांगले पाणी शिल्लक आहे. त्यातच टँकरच्या मागणीतही फारशी वाढ झालेली नाही. मात्र, उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे आवर्तन यांमुळे केवळ १० दिवसांतच जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (Dam Storage) तब्बल ७ टक्क्यांनी घटत ४१ टक्क्यांवर आला आहे.
नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणसमूहात (Gangapur Dam) सद्यःस्थितीत ५६.८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १० दिवसांपूर्वी गंगापूर धरणसमूहात ६०.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजेच १० दिवसांत हा साठा सरासरी ४ टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी याच वेळी समूहात केवळ ४७.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यामुळे ऐन फेब्रुवारीच्या मध्यावरच चिंतेचे ढग जमा झाले होते.
यंदा मात्र गतवर्षीपेक्षा पाणीसाठा जास्त असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गंगापूर धरणसमूहातील गोदावरी नदीवरील गंगापूर धरण हे सर्वांत मोठे असून काश्यपी, गौतमी, गोदावरी मध्यम स्वरूपाचे, तर आळंदी नदीवरील मध्यम स्वरूपाचे आळंदी अशी एकूण चार धरणे आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक पाणीसाठा असल्याने अद्यापही पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही.
इगतपुरीतील सहा पाड्यांचा पाणीप्रश्न सोडला तर जिल्ह्याला अद्यापही टँकरची गरज भासलेली नाही. मागील दोन वर्षांत जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे ३९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. इगतपुरीतील वाळविहीर, पायरवाडी, खडकवाडी, तळ्याचीवाडी, बकुळीचीवाडी, बैरोबावाडी या पाड्यांसाठी पहिला टैंकर सुरू झालेला आहे.
गंगापूर समूहात ५६ टक्के
गंगापूर धरणसमूहात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ५७७४ दलघफू अर्थात ५६ टक्के जलसाठा शिल्लक असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३ हजार ६२३ दलघफू जलसाठा शिल्लक आहे. कश्यपी या मध्यम धरणप्रकल्पात २१ टक्के, आळंदी धरणप्रकल्पात ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
जिल्ह्यातील सर्व धरणप्रकल्पांमध्ये सध्या २७हजार ३१० दलघफू (४१.५९ टक्के) जलसाठा शिल्लक असून, पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा शेतीच्या आणि पिण्यासाठी वापरावयाचा असल्याने पाणी जपून वापरावे. मागीलवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात धरणांमध्ये २० हजार ७३१ दलघफू अर्थात ३१ टक्के जलसाठा शिल्लक होता. यंदा हाच जलसाठा २७ हजार ३१० दलघफू आहे.