Join us

निफाडला निचांकी तापमानाची नोंद, पारा 8.7 अंशावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 3:34 PM

द्राक्ष बागा काही दिवसांवर काढणीसाठी येऊन ठेपल्या असताना दुसरीकडे निफाड परिसरात थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे.

एकीकडे द्राक्ष बागा काही दिवसांवर काढणीसाठी येऊन ठेपल्या असताना दुसरीकडे निफाड परिसरात थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. काल तापमान अकरा वरून थेट नऊ अंशावर आल्यानंतर आज थेट  8.7 अंशावर आल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे गहू, हरभरा व्यतिरिक्त इतर काही पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. यात द्राक्ष पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर्षीचे हे सर्वात नीचांकी तापमान असल्याचे सांगण्यात आले आहे. 

नाशिक जिल्ह्यात हिवाळ्यात तापमान पाच ते सहा अंशापर्यत घसरते. तर ग्रामीण भागात 2 ते 3 अंशावर जाऊन पोहचते. अशावेळी सर्वदूर कडाक्याची थंडी जाणवत असते. अशा स्थितीत पिकांवर मोठा परिणाम पाहायला मिळतो. तर काही पिकांना हे वातावरण आवश्यक असते. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. या महिन्यात द्राक्ष काढणीला आली असतात, मात्र यंदाच्या थंडीमुळे द्राक्ष पिके धोक्यात आली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रावर आज आज पारा 8.7 अंशावर आल्याची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. तर वाढत्या थंडीचा द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी हेच तापमान 11.2 अंशावर होते. मात्र रविवार 2 अंशांनी घट होऊन पारा 9.1 अंशावर येऊन ठेपला. त्यानंतर आज देखील 1 अंशाने घट  होऊन पारा पुन्हा घसरला आहे. त्यामुळे 8.7 अंश तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. नाशिक शहरातही थंडीचा जोर हळूहळू वाढत असून आज पारा 12.5 अंशावर येऊन ठेपला आहे. 

ज्वारी, द्राक्ष पिकांना धोका 

दरम्यान वाढत्या थंडीमुळे अनेक पिकांना धोका संभवतो. यात प्रामुख्याने द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होते. कारण द्राक्ष पिकाचा फुगवण आणि काढणी अवस्थेचा काळ असतो. अशा स्थितीत थंडी वाढली तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. ज्या द्राक्ष बागा फुगवणीच्या अवस्थेत आहेत. अशा बागांच्या द्राक्ष मण्यांची फुगवण थांबण्याची शक्यता असते. तर उशिराच्या द्राक्ष बागेतील फुलोऱ्यातील मण्यांची फुगवण एकसारखी होत नाही. थंडीचे प्रमाण वाढल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. वाढत्या थंडीमुळे ज्वारीच्या पिकाला फटका बसतो. ज्वारी ऐन फुलोऱ्यात असल्यास पुंकेसर तयार होऊनही ते बाहेर पडू न शकल्याने दाणे भरण्याच्या प्रमाणात घट होते. परिणामी उत्पादन घटते. 

टॅग्स :हवामाननाशिकतापमान