Join us

Nira Devghar Dam : निरा खोऱ्यातील सर्व धरणे फुल्ल, वीर धरणातून विसर्ग, प्रशासनाचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 18:03 IST

Nira Devghar Dam : वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक जास्त असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

Nira Devghar Dam : नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील तीन आठवड्यापासून संततधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस होत असल्याने हे पाणी निरा खोऱ्यात असलेल्या धरणांमध्ये साठत आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील चारही धरणे आता तुडुंब भरली आहेत. या धरणांमधून नीरा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. 

नीरा खोऱ्यात गत आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या  ठिकाणी असलेल्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात (Veer Dam) वाढ झाली आहे. आजमितीस वीर धरणाची पाणी पातळी ५७९.६५ मीटर झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. आज दुपारी १२.०० वाजता वीर धरणाच्या वरील भागातील निरा देवघर धरण (९५.४९%), भाटघर धरण १०० टक्के तर गुंजवणी धरण (९०.०० टक्के) भरले आहे. या सर्व धरणांतून विसर्ग पुन्हा वाढल्याने तसेच वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक जास्त असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दुपारी ०२ वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ५३ हजार ८४७ क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता ६१ हजार ९२३ क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. याद्वारे विनंती करण्यात येते कि, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, अशी सूचना नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केली आहे. 

असा आहे पाणीसाठा 

भाटघर उपयुक्त पाणीसाठा २३.५०२ टीएमसी एकूण टक्केवारी १०० टक्के. नीरा देवघर उपयुक्त पाणीसाठा ११:१२६ टीएमसी एकूण टक्केवारी ९५.४९ टक्के. वीर धरण उपयुक्त पाणीसाठा ८.९६८ टीएमसी एकूण टक्केवारी ९५.३२ टक्के. गुंजवणी धरण उपयुक्त पाणीसाठा ३:२५९ टीएमसी एकूण टक्केवारी ९० टक्के. निरा देवघर धरणाची पाण्याची साठवण क्षमता १२ टीएमसी असून, सध्या धरणात ९४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पूर्व पट्टयातील बारामती, फलटण, सोलापूर, इंदापूर या भागांतील पाणी प्रश्न मिटला आहे. 

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसपाणीशेती क्षेत्र