Join us

Agriculture News : नाशिकच्या मनमाड परिसरात समाधानकारक पाऊस नाही, पालखेड धरणातून आवर्तन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 5:57 PM

Agriculture News : मनमाड परिसरातील वाघदर्डी धरण अद्यापही तळाशीच असल्याचेचित्र आहे.

नाशिक : एकीकडे नाशिक जिल्ह्यात (Nashik District) बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र दुसरीकडे मनमाड परिसरात अद्यापही पाणीटंचाईची झळ ससोसावी लागत आहे. मनमाड परिसरातील वाघदर्डी धरण अद्यापही तळाशीच असल्याचे मनमाडकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पालखेड धरणातून मनमाडला आवर्तन सोडण्यात आले आहे. 

यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणाने तळ गाठला. ऐन पावसाळ्यात मनमाड शहराला (Manmad) महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होतो. अशी गंभीर परिस्थिती असतानाच शहरासाठी पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन अखेर सोडण्यात आले. शुक्रवारी हे पाणी मनमाड नगर परिषदेच्या पाटोदा साठवणूक तलावात दाखल झाले असून तेथून पाण्याचा उपसा करून ते वागदर्डी धरणात घेतले जात आहे. त्यामुळे मनमाडकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. 

मनमाडचा पाणीपुरवठा सर्वस्वी पालखेड धरणांतून मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पालखेड धरणात मुबलक साठा झाला आहे. त्यातून मनमाडसाठी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती.

पालखेड धरणातून सोडण्यात आलेले आवर्तनाचे पाणी पाटोदा साठवणूक तलावात आले आहे. तेथून उपसा करून तीन मोटर्सद्वारे ते वागदडर्डी धरणात घेतले जात आहे. यंत्रणा कार्यान्वित केली आहे.- शेषराव चौधरी, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड न.प.

टॅग्स :हवामानपाऊसनाशिकपाणी टंचाईशेती क्षेत्र