राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी 42 अंश सेल्सिअसच्यावर तापमान गेले आहे. त्यामुळे पाण्याचा वापर देखील वाढला आहे. दुसरीकडे तापमानामुळे जल स्तर घटत असून नाशिक जिल्ह्यातील जलसाठा खालावला आहे. आजमितीस जिल्ह्यातील 24 प्रकल्प मिळून केवळ 16.37 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठी वाढ झाली असून मागील काही वर्षातील हे सर्वाधिक तापमान असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच राज्यभरात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. राज्यातील अनेक मोठमोठी धरण तळाला गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आज 28 टक्के पाणी शिल्लक आहे. तर मागील वर्षी या दिवशी 42 टक्के इतका साठा होता.
असा आहे धरणसाठा
जिल्ह्यातील धरण साठा पाहायला गेलं तर गंगापूर धरणात 28.10 टक्के, कश्यपी 23.54 टक्के, गौतमी गोदावरी 11.08 टक्के, पालखेड 8.12 टक्के, ओझरखेड 00 टक्के, पुणेगाव 00 टक्के, दारणा 22.51 टक्के, भावली 0.84 टक्के, मुकणे 13.87 टक्के, वालदेवी 6.71 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 98.44 टक्के, चणकापुर 4.86 टक्के, हरणबारी 8.06 टक्के, केळझर 1.05 टक्के, गिरणा 20.58 टक्के तर माणिकपुंज 00 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 16 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.