राज्यभरातील नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. दुसरीकडे तापमान वाढत असल्याने पाणी पातळी देखील घटत चालली आहे. नाशिक जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती असून जिल्ह्यातील 24 प्रकल्प मिळून केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकीकडे पाण्याअभावी पिके सुकत चालली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आदी तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक तालुक्यांत टँकरची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पात केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिलचा पहिलाच आठवडा सुरु असून उन्हाळ्याचे पन्नास दिवस अजूनही बाकी असताना आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
असा आहे धरणसाठा
जिल्ह्यातील धरण साठा पाहायला गेलं तर गंगापूर धरणात 45 टक्के, कश्यपी 44 टक्के, गौतमी गोदावरी 35 टक्के, पालखेड 47 टक्के, ओझरखेड 12 टक्के, पुणेगाव शून्य टक्के, दारणा 24 टक्के, भावली 13 टक्के, मुकणे 30 टक्के, वालदेवी 42 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 87 टक्के, चणकापुर 19 टक्के, हरणबारी 38 टक्के, केळझर 17 टक्के, गिरणा 29 टक्के तर माणिकपुंज 09 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 28 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.