Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. ०३ ते ०७ ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान दमट राहण्याची शक्यता राहील. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २६-३० डिग्री सें. व किमान तापमान २२-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची (Nashik Rain) शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग १७-२८ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
हवामानाचा अंदाज आणि चेतावणी लक्षात घेता दि. ०२ व ०३ ऑगस्ट २०२४ रोजी (येलो अलर्ट) नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार व जिल्ह्याच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे व दि. ०४ ऑगस्ट २०२४ रोजी (ऑरेन्ज अलर्ट) नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस व जिल्ह्याच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी कृषी सल्ला
जोरदार पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता भात पुनर्लागवड क्षेत्र, नवीन लावलेलि फळबाग व भाजीपाला पिकातून जास्तीचे पाणी काढून टाकावे.
लागवडीपूर्वी टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर व कोबी रोपांची मुळे कीटकनाशक, बुरशीनाशक तसेच जिवाणू खताचे द्रावणात बुडवावे.
फ्लॉवर व कोबीचे सहा आठवड्याचे रोपे लागवडीसाठी वापरावे.
खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करावी उदा. दुधी भोपळा, कारली दोडका, घोसाळी, तांबडा भोपळा इ.
खरीप भेंडी व गवार पिकांची लागवड करावी.
लागवड केलेल्या भाजीपाला पिकामध्ये पाणी साचू देऊ नये. पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभागात (सिन्नर, चांदवड, मालेगाव, निफाड, नाशिक, येवला व नांदगाव) पडणा-या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी. पावसाचा अंदाज लक्ष्यात घेवुनच खरीप पिकांवरील किटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणीचे कामे करावी
पशुधन सल्ला
पावसाळ्यात कोवळे गवत जनावरांना जास्त खाण्यास देऊ नये. कोवळ्या गवतात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आणि कमी तंतुमय घटक असतात. पचन सुकर होण्यासाठी तंतुमय पदार्थाची आवश्यकता असते. कोठीपोट पाण्याने भरले असेल तर पचनाला त्रास होतो. साठवणूक केलेला चारा, खाद्यावर या काळात बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे खाद्य जनावरांना खाऊ घातल्यास यकृतावर विपरीत परिणाम होऊन पचन व प्रजननावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
पावसाळ्यात खाद्य, चारा कोरड्या जागेत ठेवावा. बुरशी लागली आहे का? याची वरचेवर तपासणी करावी. या काळात टॉक्सीन बाईंइंडरचा खाद्यात वापर करावा जेणेकरून बुरशी मुळे होणारे परिणाम कमी करता येऊ शकतील. पावसाळी वातावरणात गाई, म्हशी आणि इतर जनावरांना त्यांच्या शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी ऊर्जेची गरज असते, शरीरावरील केस ओले असतील, तर ऊर्जेची गरज अजून वाढते. पशुखाद्यात ऊर्जायुक्त घटक जसे मका १ किलो किंवा बायपास फॅट १०० ग्रॅम अतिरिक्त द्यावेत. जनावरांची रोग प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी, खुरे मजबूत ठेवण्यासाठी झिंक आणि बायोटीनयुक्त पशुखाद्यपूरक दररोज खाद्यातून द्यावे.