मुंबई : आजपासून पुन्हा पावसाचे (Heavy Rain) कमबॅक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार पुढील चार ते पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील १८ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
तत्पूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याच्या (Marathwada) विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाने झोडपले. काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. नदी नाल्यांच्या पुरात वाहून गेल्याने दुर्घटनाही घडल्या आहेत. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. कळमनुरी ते शेंबाळपिंपरी (जि. हिंगोली) रस्ता बंद झाल्याने मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे.
आज मुसळधारेचा इशारा
देशात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार पावसामुळे जनजीवन स्कळीत झाले. आंध्र प्रदेशात दरडी कोसळून ५ जण ठार झाले तर इतर घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला. हवामान खात्याने दक्षिणेतील राज्यांना आणखी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात....
अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या ओडिसा, आंध्रप्रदेश या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात सुद्धा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने काही राज्यासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.