नाशिक : मघा नक्षत्राने धूमशान केल्यानंतर पूर्वा नक्षत्रात नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अवघ्या ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उंदीर वाहन असलेल्या या नक्षत्रातील पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा (Dam Water Storage) उपलब्ध झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. आता सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्रातही पर्जन्यसूचक वाहन हत्ती असूनही पाऊस ओढ धरणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या नक्षत्रातही पावसाची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
यंदाच्या हंगामात मघा नक्षत्रात (Rain Update ) सर्वाधिक २००.२ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. या नक्षत्राने जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागली तर खरिपाच्या पिकांनाही जीवनदान मिळाल्याने अनेक भागात पिके तरारली आहेत. त्यामुळे पीकपाण्यासह सिंचनाचा प्रश्न जवळपास मार्गी लागला आहे. ३० ऑगस्टला सुरू झालेल्या पूर्वा नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुका वगळता समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही.
मघा नक्षत्राच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे बव्हंशी भागात पिके जोमात आहेत. धरणांमध्येही मुबलक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात आजमितीला ९७.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा सुसह्य होणार असून अनेक भागांतील टँकरची संख्याही घटली आहे. सद्यःस्थितीत १३ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
पूर्वा नक्षत्रात किती पाऊस
पूर्वा नक्षत्रात मालेगाव तालुक्यात २७.५ मि.मी., बागलाण २२.२, कळवण २६.१, नांदगाव ६१.५, सुरगाणा- १३४.४, नाशिक- २७.१, दिंडोरी ४५.८, इगतपुरी ११३.५, पेठ ३७.६, निफाड- १६.३, सिन्नर ३०.९, येवला- ४९.२, चांदवड- २१.४, त्र्यंबकेश्वर १५३.५ आणि देवळा तालुक्यात १६.९ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात नाशिक, इगतपुरी व पेठ तालुक्यात अद्यापही सरासरी पावसाने टक्केवारीची शंभरी गाठलेली नाही.
उत्तरा नक्षत्रात अल्प पाऊस
उत्तरा नक्षत्राला १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३५ वाजता प्रारंभ झाला आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक हत्ती आहे; या नक्षत्रात पाऊस ओढ धरण्याची चिन्हे आहेत. पर्जन्यछायेच्या प्रदेशात मात्र थोड्या फार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि. १४, १५, २३, २४ व २५ सप्टेंबर रोजी पाऊस अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.