Join us

Water Crisis : नांदगाव तहानलेले, पण जळगावची तहान भागवली, गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:28 PM

गिरणा धरणाच्या एकूण पाणी साठ्यातून २ हजार क्युसेक्स पिण्याच्या पाण्याचे तिसरे आवर्तन सोडण्यात आले.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या एकूण पाणी साठ्यातून २ हजार क्युसेक्स पिण्याच्या पाण्याचे तिसरे आवर्तन म्हणून रविवारी सोडण्यात आले. त्यामुळे तहानलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील अनेक गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना तसेच जनतेला ऐन दुष्काळात दिलासा मिळाला असताना दुसरीकडे मात्र नांदगाव तालुका मात्र तहानलेल्या अवस्थेत आहे. गिरणा धरण हे नांदगाव तालुक्यात असताना देखील जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांना व अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तब्बल दोन महिन्यांनी तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. १३ डिसेंबर रोजी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी दुसरे आवर्तन सोडण्यात आले. जळगाव जिल्हा अधिकारी व पाटबंधारे अभियंता यांच्या आदेशानुसार तिसरे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी सोडण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यांसह नदीकाठची गावे गिरणा नदीवर अवलंबून आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून, उष्णतेची तीव्रता, दाहकता लक्षात घेता या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. त्यानुसार पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश जिला अधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.  हे आवर्तन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले. या व्यतिरिक्त वापर, शेती सिंचनासाठी केल्यास, कायदेशीर कारवाई केली आईल, असाही इशारा पाटबंधारे उपविभाग अभियंता यांनी दिला आहे. 

गिरणा धरणाची पाणी साठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू आहे. मागील वर्षी गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. शंभर टक्के भरलेल्या गिरणा धरणातून आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी तीन वेळा आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी भडगाव, पाचोरा, कांनळदापर्यंत पोहोचेल. २१ हजार ५०० दलघफू समता असलेल्या - गिरणा धरणात सद्यस्थितीत ३० टक्के - पाणीसाठा शिल्लक आहे. जवळजवळ - गिरणा धरण परिसरात पाऊस कमी पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. ३० टक्के जलसाठा असल्याने गिरणा - नदी आटली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिका, नांदगाव शहर, ५६ खेड़ी योजना, न्यायडोंगरी, जळगाव • जिल्ह्यातील चाळीसगाव, गिरणा डॅम ते साकोरा जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे अजून काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील गावे व पाचोरा, भडगाव, जीवन प्राधिकरणाच्या दोन योजना, एरंडोल तालुक्यातील १५४ गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस पडला. कळवण पट्टयातील मोसम नदी खोऱ्यात पडलेल्या पावसाने गिरणा धरण जेमतेम ४१ टक्क्यांपर्यंत भरले. ५२ वर्षात १२ वेळा गिरणा धरण भरले.

नांदगाव तालुका तहानलेला 

नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे टँकरने २२२ वाड्या- वस्त्यांना व ४७ गावांना ४९ टँकरने ११८ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत गिरणा धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर अजूनही एक आवर्तन गिरणा धरणातून सोडले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील १५४ गावे, २१८ पाणीपुरवठा योजना आहेत. यात प्रामुख्याने चाळीसगाव शहर पाणीपुरवठा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल ही तालुके अवलंबून आहेत तर नांदगाव शहरासह ५६ खेडी व मालेगाव शहरास पाणीपुरवठा केला जातो. रविवारी सोडलेल्या आवर्तनाचे पाणी जळगाव जिल्ह्यातील कांनळदापर्यंत पोहोचेल. पाण्याचा वेग चांगला असल्यास चार दिवस लागतील, असा अंदाज वर्तविण्यात येतो.

टॅग्स :शेतीनाशिकपाणीकपातगिरणा नदीजळगाव