Join us

Nashik Rain : परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्याला झोपडले, पिकांचे नुकसान, यलो अलर्ट कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 3:13 PM

Nashik Rain : गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने जोरदार कमबॅक केले असून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस बरसत आहे.

नाशिक : परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून नाशिकला (Nashik Rain) झोडपण्यास सुरुवात केली असून एकाच दिवशी ३४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस झाला असला तरी एकूण पावसापेक्षा त्याचे प्रमाण ७ टक्के इतके कमी आहे. तर १३ धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शिवाय जिल्ह्याला यलो अलर्ट कायम आहे. 

गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने जोरदार कमबॅक केले असून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस (Nashik Heavy Rain) बरसत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून सुरवातीला रेड आणि त्यानंतर यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुसरीकडे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून इतर १२ धरणांमधून विसर्ग करण्यात येतो आहे. 

दरम्यान चार दिवसांपूर्वी केवळ ५ धरणांमधून सुरू असलेला विसर्ग पुन्हा वाढला (Gangapur Dam) असून जायकवाडीकडे पाणी वाहू लागले आहे. जिल्ह्याचे पर्जन्यमान ९३३.८ इतके असून त्यापैकी जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत ९२.३ टक्के इतका पाऊस नोंदवण्यात आला आहे. परतीच्या पावसाने ग्रामीण भागालाही झोडपल्याने शेतीला त्याचा मोठा फटका बसला. नवरात्रीसाठी लावलेला झेंडू आणि कांदा याचे नुकसान झाले. तर सिन्नरसह मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यात घरांची पडझड झाली.

नांदुरमध्यममेश्वर सवाधिक विसर्ग 

आधीच्या पावसामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. त्यातच परतीच्या पावसाने जोरदार कमबॅक केल्याने अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामध्ये दारणा ३६१२ क्युसेक, कडवा ६६४० क्युसेक, भाम ५६० क्युसेक, वालदेवी ३० क्युसेक, आळंदी ३० क्युसेक, भावली १३५ क्युसेक, गंगापूर ११६९ क्युसेक, होळकर पूल ११०० क्युसेक, वाघाड १७८ क्युसेक, वाकी ४६४ क्युसेक, नांदूरमधमेश्वर ८९३८ क्युसेक, कश्यपी ६४० क्युसेक, करंजवण ३०१ क्युसेक असा विसर्ग सुरु आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

 

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रहवामानशेतीनाशिक