Join us

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील सात धरणे झाली कोरडी, नेमकं किती पाणी शिल्लक? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 4:15 PM

यातच नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) सुमारे 7 धरणांनी तळ गाठल्याने यंदा दुष्काळाची (Maharashtra Drought) तीव्रता अधिकच वाढली आहे.

नाशिक : यंदा उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये (Nashik) पाण्याचा तुटवडा वाढला आहे. यातच जिल्ह्यातील सुमारे 7 धरणांनी तळ गाठल्याने यंदा दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. आजमितीस जिल्ह्यातील 24 प्रकल्प मिळून केवळ 13.12 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. तर गंगापूर धरणात (gangapur Dam) 27.12 टक्के पाणी शिल्लक आहे. 

राज्यभरात उन्हाची तीव्रता (Temperature) वाढली असून अनेक ठिकाणी 42 अंश सेल्सिअसच्या वर तापमान केला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर देखील वाढला आहे. दुसरीकडे तापमानामुळे जल स्तर घटत असून नाशिक जिल्ह्यातील जलसाठा खालावला आहे. सध्या जिल्ह्यातील 361 गावे आणि 936 वाड्यांना 390 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर गंगापूर धरणात आज 27.12 टक्के पाणी शिल्लक आहे. तर मागील वर्षी या दिवशी 41 टक्के इतका साठा होता.

जिल्ह्यातील सात धरणे कोरडीठाक झाली असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक गाव आणि वाड्यांना टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यातच धरण समूहाने तळ गाठायला सुरुवात केली असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गंगापूर धरण समूहामध्ये फक्त २१.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणाची पाणीपातळी २७.१२ टक्क्यांवर आली आहे. मागील वर्षी ती ४५.०३ टक्क्यांतर होती.

असा आहे जलसाठा 

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आजमितीस गंगापूर धरणात 27.12 टक्के, कश्यपी 23.54 टक्के, गौतमी गोदावरी 11.08 टक्के, पालखेड 6.74 टक्के, ओझरखेड 00 टक्के, पुणेगाव 00 टक्के, दारणा 19.21 टक्के, भावली 0.00 टक्के, मुकणे 10.87 टक्के, वालदेवी 3.00  टक्के, नांदूर मध्यमेश्वर 100 टक्के, चणकापुर 4.77 टक्के, हरणबारी 7. 98 टक्के, केळझर 0.87 टक्के, गिरणा 13.62 टक्के तर माणिकपुंज 00 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 16  टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :हवामानपाणी टंचाईगंगापूर धरणनाशिक