जळगाव : यावल, भुसावळ व जळगाव (Jalgaon District) तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणारे तापी नदीवरील शेळगाव बॅरेज २०२४ मध्ये पूर्णत्वास आले. यावर्षी शेळगाव बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठा करण्यात आला. २०२३ मध्ये ५० टक्के साठा करण्यात आला होता.
यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस (rain) झाला. तापी नदीतून पावसाचे वाहून जाणारे पाणी शेळगाव बॅरेजमध्ये थांबविण्यात आले. सन १९९९ मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली होती. तब्बल २५ वर्षांनंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. या बॅरेजची साठवण क्षमता ११६.३६६ दशलक्ष घनमीटर (४.१९ टीएमसी) आहे.
प्रकल्पामुळे तापी काठावरील (Tapi River) मासेमारी व्यवसायात मोठी वाढ होणार आहे. या प्रकल्पामुळे वायल तालुक्यातील १९ गावे प्रत्यक्ष लाभ क्षेत्रात येत असून, ९ हजार १२८ हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे.
यावल शहराला भविष्यात याच प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यावल तालुक्यातील आत गावे तर भुसावळमधील चार गावे व जळगाव तालुक्यातील तीन गावांतील शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात गेली आहे.