इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने दिलेल्या पीकनिहाय कृषी सल्ल्यानुसार उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांस खुरपणी देऊन नत्र खताचा दुसरा हफ्ता द्यावा. उन्हाळी भेंडी काढणी एक दिवस आड करावी. गवार पिकाची काढणी सुरु करावी. रबी हंगामातील कोबीवर्गीय पिकांची काढणी करावी. मिरची व वांगी रोपे तयार झाली असल्यास रोपांची पुनर्लागवड करावी लागवडीचे वेळेस संपूर्ण खतमात्रेच्या ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. वेल वर्गीय पिके : वेल वाढत असताना बगलफूट आणि तणावे काढावेत, पाने काढू नयेत. वेल ५ फूट उंचीचा झाल्यावर बगलफूट काढणे थांबवावे व मंडपावर वेली वाढू द्याव्यात. म्हणजे दर्जेदार उत्पादन मिळते.
उन्हाळी बाजरी
सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असून, या काळात खोड कीड किंवा खोड माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी मॅलाथिऑन (५० ईसी) १.४ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
उन्हाळी भुईमुग (वाढ अवस्थेत)
सध्या भुईमुग पिकावर रसशोषक किडींचा (मावा, फुलकिडे, तुडतुडे) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्या नंतर १५ दिवसांनी, डायमिथोएट (३० ईसी) १.४ मि.ली किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून दुसरी फवारणी करावी. उभ्या पिकांतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी ०.५ टक्के लोह व ०.२ टक्के झिंक सल्फेट या मिश्रणाची पेरणीनंतर ३०, ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी.
रब्बी ज्वारी (पक्कतेची अवस्था ते कापणी)
रब्बी ज्वारी पिकाची काढणी म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित फुले ज्वारी काढणी यंत्राचा सहाय्याने करावी. सुधारित फुले ज्वारी काढणी यंत्राची वैशिष्टेः हाताने ज्वारी मुळासह उपटणे कष्टदायक असते. तुलनेने कमी कष्टात ज्वारी काढता येते. बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी उपयुक्त ज्वारीच्या ताटाची जाडी कितीही जास्त असली तरी या यंत्राद्वारे सहज शक्य होते वजनाला हलके असल्याने उचलून नेणे सोपे व वापरासाठी सुलभ असून यंत्राची कार्यक्षमता आठ ते दहा गुंठे ज्वारीची ताटे प्रतिदिन आठ ते दहा दिवस कणसे उन्हात वाळून मळणे करावी धान्य उपनदी करून तयार झाल्यानंतर त्याला साठवणुकीपूर्वी पुन्हा उन्हात वाळवावे साधारणपणे 50 किलो ची पोती भरून ठेवल्यास पुढे बाजारपेठेत विक्री करणे सोपे जाते.
रब्बी गहू (पक्कतेची अवस्था ते कापणी)
गहू पीक सध्या पक्वतेची किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. गव्हाच्या काही जातींचे (उदा. एनआय. ५४३९, फुले त्र्यंबक) दाणे पीक पक्व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. गव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी, मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. अलीकडे पीक कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाच वेळी कम्बाइन हार्वेस्टरच्या सहाय्याने केले जाते. त्यामुळे वेगाने काम होते. कणसे पिवळसर, दाणे कडक झाल्यानंतर कणसे खुडून काढावीत. ही
रब्बी मका (पक्कतेची अवस्था/ कापणी)
कणसे दोन ते तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या (म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजार) साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत, दाण्यांतील पांढरी तुसे, बिट्ट्याचे तुकडे वेगळे करण्यासाठी उफनणी करावी. दाणे चांगले उन्हात वाळवून दाण्यांतील आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत ठेऊन साठवण करावी.
रांगडा हंगामातील कांदा काढणीस सुरुवात करावी. काढणीअगोदर दोन ते तीन आठवडे पाणी बंद करावे. कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी. रब्बी कांदा पिकातील करपा रोग नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल १ मिली/ली पाणी या प्रमाणात तसेच फुल किडींच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान @ २ मिली किंवा फिप्रोनील @ १ मिली/ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी. रब्बी कांदा लागवडीच्या ६० दिवसानंतर १३:०:४५ @ ५ ग्रॅ/ली पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. सौजन्य : ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषि हवामान प्रक्षेत्र विभागमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी ता. इगतपुरी, जि. नाशिक