Nashik : नाशिकसह जिल्ह्यातील बहुतांश भागांत आज दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले आहे. ऐन भरात आलेल्या द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. द्राक्ष बागांचे घड, मणी पावसामुळे कोसळून पडल्याने शेतकऱ्यांना मेहनतीवरच पावसाने पाणी फिरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह जिल्हाभरात ढगाळ वातावरणासह हवेत गारवा निर्माण झाला होता. अखेर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा कडकडाट, विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. एकीकडे वर्षभरापासून शेतकऱ्याच्या कष्टाला मातीमोल करणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तडाखा दिला. अनेक पिकांना फटका बसला असून याचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसला आहे. नाशिकच्या द्राक्ष पांढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड, लासलगाव, येवला, पिंपळगाव, गिरणारे आदी भागांतील द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
कुठे होणार गारपीट आणि वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज
जिल्ह्यातील शेकडो क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला असून, द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता आहे. तर शेतात गारांचा खच पडल्याने कांद्याचे पीकही नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोडांशी आलेला घास हिरावला गेल्याने पुन्हा एकदा अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. द्राक्ष पिका पाठोपाठ कांदा, डाळिंब, ऊस आदी पिकांसह टोमॅटो व इतर भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
द्राक्ष बागांना तडाखा
नाशिक जिल्ह्यात जोरदार गारांसह पाऊस द्राक्ष बागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वत्र गारा व पाऊस द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाडांची पाने व द्राक्ष घड़ तुटून जमीनदोस्त झाले असून द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. आता द्राक्ष पिके ऐन फुलोऱ्यात असताना अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.