Join us

नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा फटका, गारपिटीचा तडाखा; ज्वारी, गहू आडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 9:28 AM

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटीने गहू, हरभरा आणि ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रसाद आर्वीकर

नांदेड जिल्ह्यात रविवारी भोकर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, उमरी, मुदखेड, अर्धापूर तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे पिके आडवी झाली होती. नांदेड शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण होते, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यामध्ये गहू, हरभरा आणि ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उमरी तालुक्यात रविवारी दुपारनंतर गारपीट झाली, यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तालुक्यातील उमरी, गोरठा, तळेगाव, फुलसिंगनगर, इश्वरतांडा, सोमठाणा, दुर्गानगर, कळगाव आदी भागातील पिकांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटकाबसला. उमरी, तळेगाव या भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

दरम्यान अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक वादळी वाऱ्यामुळे आडवे झाले. सध्या हरभरा तसेच काही भागात गहू काढणीला आलेला आहे. ही कामे चालू असतानाच शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तळेगाव शिवारात शेकडो एकर शेतीमध्ये तंबाखूचे उत्पादन घेण्यात आले आहे. तंबाखूच्या पानांची तोडणी केल्यानंतर भट्टी लावण्याचे काम चालू आहे. अशावेळी अचानक वादळी वारे व पाऊस आल्याने या भट्टी शेडचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मागील दहा महिन्यात चौथ्यांदा गारपीट

मुदखेड तालुक्यात दुपारी गारपीट होऊन गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. मागील दहा महिन्यात चौथ्या वेळी गारपीट झाली आहे. कोल्हा, मेंढका, वाई, वरदडा, डोणगाव आदी गावांत रविवारी दुपारी अवकाळी पावसासह गारपीट होवून पिकांचे नुकसान झाले. तसेच सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूक करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा चोर येथील दत्ता दिगंबर वाघमारे या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसाचा फुल शेतीला व भाजीपाला शेतीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ऊस नेणाऱ्या कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागला, गारपीटमुळे अनेक शेतातील ज्वारी, गहू, भुईसपाट झाले.

भोकर, अर्धापूरला अवकाळीने झोडपले

भोकर, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव, उमरी आदी तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसाने झोपडले, जोराचा वारा, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अर्धापूर, मुदखेड परिसरात केळी, पपईच्या बागांना फटका बसला आहे. तसेच फुलशेतीचेही नुकसान झाले आहे.

हिमायतनगरात गारा

हिमायतनगर तालुक्यात मेघ गर्जना होवून गारासह अर्धा तास पाऊस झाल्याने तूर, रब्बी गहू, हरभरा, टाळकी, भाजीपाला, आंबामोहर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतात तुरीचे पीक कापणी करून तुरीच्या खुंटावर ठेवले आहे. तसेच तुरही शेतामध्ये विखरून आहे. गव्हाचे पीक ८० टक्के कापणीला आले आहे. तसेच हरभरा काढणीला आला असून टाळकी हुरड्यावर आहे. आंब्याला मोहर आला आहे. कामारी, जवळगाव, टेभूर्णी, पळसपूर,  डोल्हारी, शिरंजनी, एकंबा, बोरगडी, मंगरुळ, सवना, टेंभी, आंदेगाव, सरसम, पोटा, खडकी, पवना, दरेसरसन, टाकराळा, वडगाव आदींसह गावावर कमी-अधिक गारासह अर्धा तास पाऊस झाला आहे. गव्हाची पीक काढणीला आले असून हरभरा ही काढणीला आला आहे. त्यात पावसाने फटका बसला.

किनवटमध्ये पाऊस किनवट शहर व परिसरात रात्री ९.३० वाजेच्या सुमारास धुर्वाधार अवकाळी पावसाने झोडपले. तर दुपारी ४ च्या सुमारास तालुक्यातील धामनदरी गाव व परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाचचे सुमारास अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे रब्बी हंगामाला फटका बसला आहे. गारपिटीने जीवित हानी झाली नाही. मात्र सर्व यंत्रणेला गाव भेटी देण्याचे आदेश तहसील प्रशासनाने दिले आहेत. रात्री उशिरा किनवट परिसरात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :शेतीहवामानपाऊसनांदेड