मान्सून प्रगतीपथावर असुन आज निम्मा बंगालचा उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभागही दोन हिस्याने काबीज केला आहे. मान्सून आगमन भाकीत तारखेला म्हणजे ३१ मे दरम्यान केरळात तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात त्याचे आगमन होवु शकते.
मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकरही सक्रिय होवु शकते. तसे झाल्यास सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी ह्या ६ व लगतच्या जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे कदाचित अगोदरही होवु शकते. अर्थात हे सर्व जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडीवर अवलंबून असेल.
मान्सूनपूर्व सरी कधी कोसळणार?
वरील तारखा ह्या मान्सूनच्या सरासरी पावसाच्या आहेत. सध्याच्या उष्णतेच्या लाटा सदृश्य स्थिती पाहता, मान्सून पावसाच्या अगोदर वळीव स्वरूपातील पूर्वमोसमी, पावसाच्या सरीही कोसळू शकतात. शेतमशागतीसाठी त्यांचा उपयोग होवु शकतो.
बं.उप सागरातील ' रेमल' चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होईल?
बं. उपसागरात तयार झालेले अतितीव्र स्वरूपातील ' रेमल ' नावाचे चक्रीवादळ सोमवार दि.२६ मे ला मध्य रात्री ला ताशी १३० ते १३५ किमी. चक्रकार वारा वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.मान्सून वाटचालीवर तसेच महाराष्ट्रात चालु असलेल्या उष्णता लाट सदृश्य स्थितीवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम जाणवणार नाही, असे वाटते.
आशियाई देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रादेशिक भाषेत च. वादळ संबंधी सुचवलेली नांवे व बनवलेली यादीनुसार आता येणाऱ्या च. वादळासाठी ओमान देशाने सुचवलेल्या ' रेमल ' नांव येत आहे. म्हणून ह्या पूर्वमोसमी हंगामातील चक्रीवादळाला ' रेमल ' नांव दिले आहे. अरेबिक भाषेतील त्याचा अर्थ ' वाळू ' किंवा ' रेती ' होय.
विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी व उष्णतेची स्थिती किती दिवस असेल?
विदर्भ, मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात उद्या दि.२६ मे पासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि.३० मे पर्यन्त अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणवते.
कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी व उष्णतेची स्थिती किती दिवस असेल ?
मुंबईसह कोकण सह खान्देश, मध्य महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात अवकाळीची स्थितीबरोबरच पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि.१ जूनपर्यंत उष्णता सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणवते.
महाराष्ट्रात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही का जाणवतोय?
कोकण वगळता महाराष्ट्रात सध्याचे दुपारचे कमाल तापमान ४० ते ४४ तर पहाटेचे किमान तापमान हे २८ ते ३० डिग्री से.ग्रेड दरम्यान आहे. सध्याच्या सरासरी तापमानापेक्षा कमाल ३ ते ४ तर किमान ४ ते ५ डिग्री से.ग्रेडने अधिक राहण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, असे वाटते. मुंबईसह कोकणात मात्र कमाल तापमान ३४ तर किमान तापमान हे २६ डिग्री से.ग्रेड दरम्यानचे राहून सरासरी तापमानापेक्षा ते ३ ते ४ डिग्री से.ग्रेडने अधिक असेल. तेंव्हा तेथेही दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही जाणवेल, असे वाटते.
लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे