सध्या गेल्या काही वर्षापासून जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या विषयावर बरीचशी चर्चा होतांना दिसून येत आहे. यावर्षी सुद्धा भारतामध्ये पावसाच्या आगमना विषयी अनिश्चितता तसेच सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे पाऊस हा लांबणीवर पडणार अशी भितीही महाराष्ट्रातील शेतकर्यांना भेडसावत आहे. त्याचे कारणही तसेच आहे आपला देश हा कृषि प्रधान अर्थव्यवस्थेवर अवलंबुन असल्यामुळे शेती ही मुख्यत्वे हवामानावर अवलंबुन आहे. त्यामुळे तापमानवाढ आणि हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला अधिक आहे.
जागतिक तापमान वाढीची कारणे आणि हवामान बदल
पृथ्वीभोवती वातावरणातील हवेत ऑक्सीजन २१ टक्के आणि नायट्रोजन ७८ टक्के असे एकुण ९९ टक्के प्रमाण असते. तर उरलेल्या १ टक्के वायु पैकी कार्बनडायऑक्साईड ०.०३ टक्के आणि मिथेन, ब्रोमीन, अरगॉन इत्यादी वायु हे अल्पशा प्रमाणात असतात या अल्पशा प्रमाणातील वायुंमध्ये वाढ होत असून हे वायु सुर्यप्रकाशाची उर्जा/उष्णता साठवितात त्यामुळेच हवेचे आणि वातावरणाचे तापमान वाढते.
कृषी व हवामान बदल -
शेती ही पुर्णत: वातावरणावर अवलंबुन आहे आणि मुख्यत्वे प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करण्याची प्रक्रीया ही अविरत झाडांमध्ये सुरु असते. शेतीमध्ये जसा पावसाळा आणि हिवाळा येतो, तसाच कडक उन्हाळा देखील महाराष्ट्राच्या पाचवीला पुजला आहे, असे म्हणण्यात वावगे ठरणार नाही. हा उन्हाळा किती तीव्रतेचा आहे किंवा या काळात सुर्य किती आग ओकत राहतो, अथवा तो कोणत्या महिन्यात किती कालावधी ढगांमध्ये (ढगाळ वातावरणात) दडी मारुन राहिलेला असतो.
या सर्व बाबींवरुन पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यामध्ये फळबागांचा विचार केल्यास झाडांचे कडक उन्हामध्ये संरक्षण करणे गरजेचे असते. यामध्ये नवीन लागवड केलेल्या नारळाला सावली देणे, तापमान कमी असतांना हिवाळ्यामध्ये धुके किंवा दवबिंदु असल्यास काही हानिकारक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसुन येतो जसे कि, गव्हावरील तांबेरा, द्राक्षांमध्ये झॅन्थोमोनास इत्यादी. यामध्ये शेतीजर फायद्याची करायची असेल तर हवामान बदलास प्रभावीपणे तोंड देणे शेतकर्यांना गरजेचे आहे.
हवामान बदलास प्रभावीपणे तोंड देण्यासाठी शेतकर्यांनी खालील हवामान अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब करावा.१. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी सेंद्रीय घटकांचा / जिवाणु खताचा जास्तीत जास्त वापर करणे.२. पिकांची फेरपालट करणे, एकात्मिक कीड व्यवस्थापनाद्वारे कीडींचे योग्य नियंत्रण करणे, तसेच एकात्मिक खत व्यवस्थापनाद्वारे जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन टिकविणे.३. शेतीच्या योग्य नियोजनाद्वारे शेतकर्याचे उत्पन्न वाढविणे व उत्पादन खर्च कमी करणे. ४. हवामान अनुकुल शेतीविषयी शेतकर्यांमध्ये जाणीव जागृती करणे.
लेखक
- केदार चोबे, कृषी व्यवस्थापन तज्ञ