धुळे : कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत असून असून धुळे जिल्ह्याचे तापमान ३९ अंशावर स्थिरावले आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील लघु अणि मध्यम प्रकल्पात पाण्याचा साठा २५ टक्केपर्यंत पोहचला आहे. काही प्रकल्प कोरडे होत असून त्यात केवळ मृतसाठा आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलेले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी ४०.४८ टक्के जलसाठा शिल्लक होता.
पाण्याची यंदाची स्थिती अतिशय बिकट झालेली आहे. जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावे व पाड्यांना एप्रिलमध्ये पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आलेली आहे. गेल्या वर्षी एवढ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवलेली नव्हती. यंदाच्या वर्षी मे व जूनमध्ये पाणीटंचाईची अवस्था भीषण असेल असा प्राथमिक अंदाज आहे. सद्यस्थितीत लघु आणि मध्यम प्रकल्पात सध्या १२४.६१ दलघमी इतका साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात १२ मध्यम आणि ४७ लघु प्रकल्प आहेत. प्रकल्पाची क्षमता ४९४.८६ दलघमी इतकी आहे. लघु प्रकल्पाची जलसंचयन क्षमता १२१.९७ इतकी आहे.
दरम्यान धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्वात जास्त ३४ दलघमी जलसाठा हा अनेर प्रकल्पात आहे. तर सर्वात कमी म्हणून शून्य दलघमी जलसाठा हा सोनवद, अमरावती व मुकटी प्रकल्पात आहे. बहुतांश लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. लघु प्रकल्पात अवधा १२.६५ दलघमी म्हणजे केवळ ११.१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१.४३ दलघमी असून सध्या याठिकाणी ३०.०२ टक्के जलसाठा आहे. ४७ पैकी अवघ्या चारच लघु प्रकल्पात ५० टक्केहून अधिक जलसाठा आहे. ३४ लघु प्रकल्पात १ ते ५० टक्के जलसाठा असून अनेक लघु प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत.
असा आहे जलसाठा
पांझरा धरण 20 टक्के, मालनगाव 42 टक्के, जामखेड 35 टक्के, कनोली 18 टक्के, बुराई नऊ टक्के, करवंद 46 टक्के, अनेर 69 टक्के, सोनवद शून्य टक्के अमरावती शून्य टक्के, अक्कलपाडा 36 टक्के, वाडीशे वाडी एक टक्के, सुलवाडे 48 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. असा मध्यम प्रकल्पात एकूण 30 टक्के तर लघु प्रकल्पात 11 टक्के जलसाठा शिल्लक आहे. असा एकूण जलसाठा अवघ्या 25 टक्क्यांवर आहे.