यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने अनेक भागामध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. शिवाय लहान स्त्रोताबरोबरच मोठे स्त्रोत आटू लागले आहेत. एकीकडे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सुरु असताना अद्यापही तीन महिन्याचा उन्हाळा शिल्लक असताना पाण्याचे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील धरणात केवळ 44 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यातच जलसाठे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. यात नदी नाले विहिरी आदींची अवस्था बिकट होत चालली आहे. त्यात धरणांची स्थिती देखील खालावत चालली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्पामध्ये केवळ 44 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हाच जलसाठा 67 टक्क्यांवर होता. त्यामुळे यंदा जलसाठा निम्म्यावरही नसल्याचे चित्र आहे. आगामी काळात मोठ्या पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार हे निश्चित असल्याचे यावरून दिसून येत आहे.
दरम्यान आजच्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला असता गंगापूर धरणांत 61.37 टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणातील पाणीसाठा चिंतेत भर टाकणारा आहे. कारण मागील वर्ष या सुमारास 74 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे आगामी काळात नाशिक शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणाचा विचार केला तर कश्यपी धरण 91 टक्के, गौतमी गोदावरी 56 टक्के, आळंदी 55 टक्के, पालखेड 26 टक्के, करंजवण 46 टक्के, ओझरखेड 43 टक्के, दारणा 43 टक्के, भावली 33 टक्के, वालदेवी 84 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 96 टक्के, चणकापूर 43 टक्के, हरणबारी 41 टक्के, गिरणा 33 टक्के, माणिकपुंज 21 टक्के असा एकूण केवळ 44 टक्के जलसाठा नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध आहे.
आठ दिवसांपूर्वीचा जलसाठा
आठ दिवसांपूर्वीच्या जलसाठ्याचा विचार केला तर गंगापूर धरणात 64 टक्के. त्यानंतर अनुक्रमे कश्यपी धरण 92 टक्के, गौतमी गोदावरी 62 टक्के, आळंदी 62 टक्के, पालखेड 30 टक्के, करंजवण 47 टक्के, ओझरखेड 44 टक्के, दारणा 48 टक्के, भावली 40 टक्के, वालदेवी 86 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 89 टक्के, चणकापूर 50 टक्के, हरणबारी 60 टक्के, गिरणा 30 टक्के, माणिकपुंज 23 टक्के असा एकूण केवळ 49 टक्के जलसाठा उपलब्ध होता. तो आठ दिवसात 05 टक्क्यांनी घटून 44 टक्क्यांवर आला आहे.