- जिजाबराव वाघजळगाव : जवळपास निम्म्या जळगाव जिल्ह्याची (Jalgaon) सिंचनासाठी मदार असलेल्या गिरणा धरणात (Girana Dam) पाण्याचा ओघ मंदावला आहे. सद्यस्थितीत धरणात जलसाठा ४३.४१ टक्के एवढा आहे. यंदा निम्मेसुध्दा धरणे भरलेले नसल्याने शेतकरी वर्गासह निम्म्या जळगाव जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.
यंदा पावसाळ्यातील (Monsoon) पहिली तीन नक्षत्रे संपल्यानंतरही गिरणा धरणात पाण्याची अजिबात आवक नव्हती. जलसाठा ११.७५ टक्क्यांवरच स्थिरावलेला होता मात्र चार ऑगस्टपासून धरणात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता जलसाठा ४० टक्क्यांच्यावर गेला असला तरी येणाऱ्या पाण्याचा ओघ आता मंदावला आहे. यंदाही धरणातील जलसाठ्याची एक्सप्रेस धीम्या गतीने धावते आहे. गिरणा धरणाच्या वरील भागात चणकापूर, पुनद, हरणबारी, केळझर, ठेंगोडा असे मध्यम प्रकल्प असून कळवण, देवळा आदी भागात दमदार पाऊस झाल्यास ते ओव्हरफ्लो होतात.
गेल्या आठवड्यात या भागात चांगला पाऊस झाल्याने या प्रकल्पांमधून पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे त्यामुळेच ११.७२ टक्के असलेला जलसाठा गत १२ दिवसांत ४३.४१ टक्के झाला आहे. या जलसाठ्यामुळे पेयजलाची समस्या सुटणार असली तरी, गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही शेतीसिंचनाची परवड होईल का ? याप्रश्नाने शेतकरी धास्तावले आहेत.
गिरणा का महत्त्वाचे?जळगाव जिल्ह्यातील १८२ हून अधिक पाणीपुरवठा योजनांसह चाळीसगाव शहर, मालेगाव तसेच नांदगाव शहराला गिरणा धरणातून पाणीपुरवठा होतो. मालेगाव व चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची चाकेही गिरणा धरणाच्या जलधारेवर फिरतात. गेल्यावर्षी हे धरण जेमतेम ५३ टक्केच भरले होते. याचा थेट फटका शेती क्षेत्राला बसला. गेल्यावर्षी गिरणातील जलसाठा पेयजलासाठीच आरक्षित केला गेला. शेतीसिंचनासाठी आवर्तन मिळू शकले नाही. पेयजलासाठी देखील सहाऐवजी चारच आवर्तने दिली गेली.