गोंदिया : अवकाळी पाऊस व गारपीट जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या विदर्भात ठाण मांडून आहे. हेच कारण आहे की, हवामान खात्याने अवघ्या विदर्भालाच 'येलो आणि 'ऑरेंज' अलर्ट दिला आहे. बुधवारपर्यंत 15 मे पर्यंत अवघ्या विदर्भातच ही स्थिती असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर त्यासोबतच गारपिटीचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
यंदाचा उन्हाळा अवकाळी पावसाच्या हजेरीने कसा निघून गेला कळलेच नाही. मात्र मे महिन्यात ऊन भाजून काढणार असाच काहीसा विचार सर्वांच्या मनात येत होता. मात्र मे महिन्यातही अवकाळी पावसाने जिल्ह्यालाच नव्हे तर अवघ्या विदर्भाला सोडले नाही. मंगळवारपासून (दि. ७) अवकाळी पावसाने परत एकदा एन्ट्री मारली आहे. तर आता थेट बुधवारपर्यंत (दि. १५) अवघ्या विदर्भात अवकाळी पाऊस व सोबतच गारपीट होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून यामुळेच 'येलो' व 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी जिल्ह्यात मात्र दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिली असून उन्ह तापत असल्याने पारा ३८.२ अंशांवर पोहचला आहे.
हवामान खात्याने एकीकडे अवकाळी पावसाचा इशारा दिला असतानाच मधामधात उघाड येत असून उन्ह तापत असल्याने पारा चढताना दिसत आहे. अशातच येत्या बुधवारपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी तापमानात वाढ होऊन ३९ ते ४१ अंशापर्यंत जाणार असल्याची शक्यताही वर्तविली आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३६.६ व किमान तापमान २२.२ अंश होते. मात्र शनिवारी त्यात वाढ होऊन कमाल तापमान ३८.२ अंश तर किमान तापमान २५.८ अंशांवर पोहचले होते.
असा आहे हवामान खात्याचा अंदाज
दरम्यान पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज पाहिला असता आज 12 मे रोजी 39 अंश तापमान तर अवकाळी पाऊस, 13 मे रोजी 39 अंश तापमान तर अवकाळी पाऊस, 14 मे रोजी 40 अंश तापमान तर पाऊस आणि वादळीवारा, 15 मे रोजी 41 अंश तापमान तर अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत...
उत्तर प्रदेशच्या मध्य क्षेत्रात समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. या चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसामपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दोन्ही समुद्रांतून होणारा बाष्प पुरवठा आणि मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत तयार झालेल्या स्थितीमुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपिटीचे वातावरण तयार झाले आहे.