Weather Update : एकीकडे नैसर्गिक संकटे, पाऊस, बदलते हवामान (Weather) यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. मात्र आता केंद्र शासनाने थेट ग्रामपंचायत स्तरावर हवामान अंदाज दिला जाईल, अशी यंत्रणा उभी करण्याचे ठरविले आहे. यापूर्वीच इ स्वराज (eSwaraj) या ग्रामपंचायत स्तरावर वापरल्या जाणाऱ्या अँपवर हि माहिती मिळत होती, मात्र आता अधिक अचूक, तत्पर सेवा ग्राम स्तरावरील शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षात नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांना हतबल केले आहे. बदलत्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना नेमके पीक व्यवस्थापन (Crop Management) करणे अवघड होऊन बसते. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळावा यासाठी पंचायती राज मंत्रालय, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, सिंचन, कापणी इत्यादिंसह इतर शेती कामांचे नियोजन करण्यास मदत होईल.
या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण तसेच महापूर, ढगफुटी, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीची तयारी वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम ई-ग्रामस्वराज, मेरी पंचायत ॲप आणि ग्राम मंचद्वारे हवामान अंदाज दिला जाईल. गेल्या 10 वर्षांत अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान अंदाज अचूकता 40 टक्क्यांनी वाढली असल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. याच अनुषंगाने या उपक्रमाद्वारे पाच दिवसांचे हवामान अंदाज, दर तासाला अपडेट केले जातील.
अंदाज कोठे उपलब्ध असतील?
ई-ग्रामस्वराज आणि ग्राम मंच पोर्टल आणि मेरी पंचायत ॲपवर तासाभराचे अंदाज उपलब्ध असतील. ई-ग्रामस्वराज यावर आधीच अंदाज मिळत असतात. यात सध्याचे तापमान, वाऱ्याचा वेग, ढगांचे आच्छादन (टक्केवारीत), पाऊस आणि सापेक्ष आर्द्रता ग्रामपंचायतींच्या पातळीवर डेटा पाहता येणार आहे. किमान आणि कमाल तापमानाचा पाच दिवसांचा अंदाज, पाऊस, ढगांचे आवरण, वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग आणि एकूण हवामानाचा अंदाज दिला जाणार आहे.