Join us

गहू काढणीला, वाढत्या उन्हाचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:14 PM

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे.

शेतकऱ्यांसाठी गहू हे महत्वाचे पीक मानले जाते. यंदाच्या हंगामातील गहू लवकरच काढणीला येणार आहे. काही भागातील गहू बाजारातही येऊ लागला आहे. अशावेळी गव्हाचे भाव काय राहतील, याचा अंदाज शेतकरी वर्गाकडून बांधला जात आहे. दुसरीकडे यंदा नैसर्गिक संकटावर मात शेतकऱ्यांनी गहू फुलवला आहे. अनेकदा उशिरा लागवड केल्यामुळे वाढत्या तापमानाचा फटका गव्हाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता असते. 

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. एकीकडे यावर्षी इतर शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात विकावा लागत आहे. त्यामुळे यावर्षी गव्हाला तरी चांगला भाव मिळेल आणि चार पैसे गाठीशी पडेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. भरघोस उत्पादन घ्यावयाचे असेल तर १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान गव्हाची लागवड करणे आवश्यक असते. उशिरा लागवड केल्यास शेवटच्या टप्प्यात तापमानवाढीचा फटका उत्पादनवाढीला बसतो. शिवाय अवकाळी पाऊस, गारपीट, वादळवारा याचाही मार पिकांना सहन करावा लागतो. यावर्षी अवकाळी पावसामुळे कळंब तालुक्यात २०२ हेक्टरपर्यंत गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. 

कोणकोणते धोके असतात? 

गहू पिकाला थंडी पोषक ठरत असते. लागवडीच्या काळात थंडी काहीशी कमी होती. मात्र त्यानंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळाली. सद्यस्थितीत उन्ह वाढले असून त्यामुळे उशिरा गहू लावणाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे गहू काढणीला आला असताना विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागातील तापमान ३३ अंशांवर पोहोचले आहे. यवतमाळ कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन हजार १०० हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. यातील काही शेतकऱ्यांचा गहू काढणीला आला आहे.

कृषी अधिकारी म्हणतात? 

कळंब येथील कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत म्हणाले की, गव्हाची लागवड १५ नोव्हेंबरच्या आसपास करणे फायदेशीर ठरते. किमान ७ ते कमाल २१ अंश तापमानात गहू चांगला उत्पादित होतो. २५ अंश तापमान असल्यास दाणे चांगले भरते. गव्हाची लागवड उशिरा केल्यास उत्पादनात घट होते. रब्बीतील गव्हाची पेरणी उशिरा केल्यास गहू काढणीला येतो, तेव्हा तापमान वाढलेले असते. याचा परिणाम उत्पादनावर होतो.

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :शेतीपेरणीगहूयवतमाळ