लातूर शहरातील पूर्वभागात बुधवारी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली. त्यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या.
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवातील काळामध्ये दरवर्षीच जिल्ह्यात कुठे ना कुठे भूकंपाची चर्चा होते. त्यामुळे भ्रमणध्वनीवरून शहरभर एकमेकांना भूकंप झाला का अशी विचारणा झाली.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने भूकंप नसल्याचे स्पष्टीकरण दिले. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रामध्ये लातूर जिल्हा व परिसरात कोठे भूकंप झाला का, याची पडताळणी आपत्ती व्यवस्थापनाने केली. मात्र लातूर जिल्ह्यात कुठेही भूकंप झाल्याची नोंद या केंद्रावर नाही.
त्यामुळे विवेकानंद चौक परिसरात झालेला आवाज टायर ब्लास्टचा किंवा भूगर्भातील हालचालींचा आवाज असू शकतो. भूकंप झाला असता तर त्याची तीव्रता शहराच्या सर्व भागांमध्ये जाणवली असती, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने म्हटले आहे.
भूकंपाच्या कटू आठवणी
■ गतवर्षी हासोरी परिसरामध्ये सप्टेंबर महिन्यातच भूकंपाचे धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात २ रिश्टर स्केलची नोंद झाली होती. शिवाय, किल्लारीचा भूकंप सप्टेंबर महिन्यात ३० रोजी झाला होता.
■ त्या दिवशी गणेश विसर्जन होते. शिवाय, वर्षानुवर्षे गणेशोत्सव आला की लातूर जिल्ह्यात भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या होतात. मध्यंतरी बराच काळ निलंगा तालुक्यातील काही गावांत भूगर्भातून आवाज येत होते.