तांत्रिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या अलमट्टीतून सोलापुरात पाणी आणणे अशक्य असल्याने या विषयाला पूर्ण विराम देण्याचा विचार प्रशासन करीत आहे. मागील पंधरा दिवसांपासून या विषयावर काहीच प्रशासकीय हालचाली दिसेनात.
मागच्या महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी आणण्याची मागणी झाली. त्यानंतर, तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाणी आणण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून पाणी आणू, असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले. परंतु, त्यानंतर माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकदाही बैठक घेतली नाही. पाठपुरावाही केला नाही.
जलसंपदा विभागाने दोनवेळा प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिला. परंतु, मंत्री स्तरावर काहीच हालचाली झाल्या नाही. अशात कर्नाटक, तमिळनाडू या दोन राज्यात कावेरी नदीच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने सुरू आहेत. दोन राज्यांत पाणी विषय तापला आहे.
तांत्रिकदृष्ट्याही अशक्य
अलमट्टी धरणातून पन्नास क्युसेक पाणी सोडल्यास औज बंधाऱ्यात केवळ वीस ते पंचवीस क्युसेक पाणी पोहोचेल, असा अहवाल जलसंपदा विभागाने शासनाला दिला आहे. सोलापूर ते अलमट्टी धरण या मधला अंतर १६० किलोमीटर इतका आहे. तांत्रिकदृष्ट्या तेथून पाणी आणणे अडचणीचा ठरु शकतो, असा अहवाल जलसंपदा विभागाने दिला आहे.
आदेशानंतर जलसंपदा विभाग लागले कामाला
अलमट्टी धरणातून पाणी घेतल्यानंतर सोलापूरला जास्त पाणी मिळणार नाही, अशी भूमिका जलसंपदा विभागाने सुरुवातीपासून मांडली. कारण, यापूर्वी अलमट्टीमधून पाणी घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यातून सोलापूरला जास्त पाणी मिळाले नाही. ही माहिती जलसंपदा विभागाने शासनाला दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिल्यामुळे जलसंपदा विभाग नाइलाजाने पाणी मार्गाचा सर्व्हे केला. पुन्हा एकदा तांत्रिक बाबी तपासल्या. आदेशानुसार सर्व्हे अहवाल शासनाकडे पाठवला.