Join us

औरंगाबाद जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या सरींचे, पिकांची कशी घ्याल काळजी?

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 31, 2023 7:06 PM

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार औरंगाबाद जिल्ह्यात पुढील तीन दिवसात हलक्या ते माध्यम सरींचा पाऊस होणार आहे. ३१ जुलै ते ...

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार औरंगाबाद जिल्ह्यात पुढील तीन दिवसात हलक्या ते माध्यम सरींचा पाऊस होणार आहे. ३१ जुलै ते ०२ ऑगष्ट २०२३ रोजी बऱ्यापैकी व्यापक प्रमाणात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहणार असून शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी याचाही सल्ला देण्यात आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक ०२ ते ०८ ऑगस्ट २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कापूस- रोप ते वाढीची अवस्थामागील आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकामध्ये मुळ कुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पिकामध्ये कोळपणी व तण नियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघून करावीत. तसेच कापुस पिकामध्ये लागवडीच्या वेळी खताची पहिली मात्रा दिली नसल्यास, ६०:६०:६० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर आळे पद्धतीने किंवा पेरून द्यावा.  

मक्यावर स्वच्छ वातावरणात करा फवारणीमका पिकामध्ये स्फुरद या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाची पाने जांभळी पडत असून याच्या व्यवस्थापनासाठी १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ या विद्राव्य खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

ऊसआडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३०० मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५ मिनिट द्रावणात बुडवावे. रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो + स्फुरद विरघळणारे जिवाणू २.५ किलो + १ किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात द्रावण करून त्यामध्ये १५-२० मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.  तुर, मूग उडीद पिकांवर कोळपणी व तण नियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करावीत.

सीताफळाची अशी घ्या काळजी सिताफळ बागेत पिठ्या ढेकूण किटकावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी बागेतील सर्व झाडाच्या जमिनीलगत बुडावर चिकट बँड किंवा प्लास्टिकच्या टेपचा वापर करावा व प्लास्टिक टॅपवर चिकट वंगण (ग्रीस) पसरवावे.  

भाजीपालाटोमॅटो पिकावर शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी जर प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन १० टक्के ई.सी.०६ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी. १० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एस सी ०३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. 

चारा पिकेसध्यस्थितीत पशुधनास दैनंदिन आहारामध्ये हिरव्या व वाळलेल्या चा-याचे प्रमाण २:१ ठेवावे. हिरवे गवत कापताना साधारण ६ इंच खोडव्यापासून अंतर ठेऊन कापावे. चारा पिकामध्ये आंतरमशागतीची कामे शेतामध्ये वापसा असल्यास करून घ्यावीत. 

पशुसंवर्धनसद्यस्थितीत शेळ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शेडमध्ये चुना टाकावा जेणेकरून बाहेरून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच शेळ्या व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे. 

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजपाऊसशेतकरीमोसमी पाऊसपीक व्यवस्थापनपीककृषी विज्ञान केंद्र