मागील तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानंतर आज राज्यभर हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. आज दक्षिण कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस म्हणजेच १२ व १३ सप्टेंबर रोजीही संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार असून कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. आज वाऱ्याचा वेग 45 ते 55 प्रति तास राहणार असून अरबी समुद्राच्या पश्चिम भागात वाऱ्याचा वेग अधिक असण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाने दमदार आगमन केल्यानंतर पुढील दोन दिवस हलक्या सरींवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. मात्र, 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्रसह मराठवाडा व बहुतांश राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
आज विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.