Join us

Lightning Alert App: तुमच्या शेतात वीज पडण्याची शक्यता आहे का? भारत सरकारचा हा ॲप देणार विजेची घंटा!

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 04, 2024 12:57 PM

४० किलोमिटरच्या अंतरात वीज पडू शकते का? याचा अंदाज शेतकऱ्यांना महत्वाचा..

राज्यात आता खरीप पेरण्या जवळ आल्या आहेत. मान्सूनला देशात सुरुवात झाली असून अनेक भागात वीज पडून शेतकऱ्यांसह अनेकांचा मृत्यू होत असल्याची वृत्त कानावर पडत आहे. भारतात दरवर्षी २ हजारांहून अधिक मृत्यू वीज पडून होतात. दरम्यान, खरीप पेरण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या ४० किमी अंतरात वीज पडू शकते का हे आता शासनाच्या ‘दामिनी’ मोबाईल ॲपमधून कळू शकणार आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था पुणे यांच्यामार्फत हा ॲप विकसित करण्यात आला आहे.

कसे कळणार आपल्या भागात वीज पडणार का?

  • आपल्या भागातील ४० किमी अंतरात वीज पडण्याची शक्यता कितपत आहे याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला दामिनी हा ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावा लागेल.
  • या ॲपला तुम्ही इथूनही डाऊनलोड करू शकता..‘Damini: Lightining Alert’ असे या ॲपचे नाव आहे.

 

 

  • हा ॲप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती भरावी लागेल. यात आपले नाव, मो. नं, पत्ता, पिनकोड, व्यवसाय याचा समावेश असेल.
  • यानंतर ॲपमधील सूचना तुम्हाला कोणत्या भाषेत हवी आहे हे निवडा.
  • यानंतर तुम्ही कोणत्या भागात राहता याची माहिती देण्यासाठी GPS सेटिंगमधून परवानगी द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला एक हिरवी किंवा लाल स्क्रिन दिसेल. याचा अर्थ तुम्ही राहता त्या भागाच्या ४० किमी अंतरावर वीजेचा कोणताही धाेका नाही. याउलट जर लाल स्क्रीन असेल तर तुमच्या भागात वीज पडण्याची शक्यता आहे.
  • या ॲपमध्ये वीजेपासून कसे वाचायचे? यासह इतर महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

खरीप पेरण्यांच्या तोंडावर शेतात पेरण्यांची लगबग सुरु होईल. यावेळी पावसाच्या शक्यतेमुळे वीज पडण्याची शक्यताही वाढते. अशा वेळी हा ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या भागात वीज पडण्याचा धोका आहे की नाही हे सांगणारा असून कृषी विज्ञान केंद्रानेही हा ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :हवामानवादळशेतीतंत्रज्ञान